Aaditya Thackeray : 'मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्याचे प्लॅनिंग योग्य प्रकारे झाले नसल्याचे दिसतंय'
मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावरुन आणि तिथे झालेल्या करारांवरुन आदित्य ठाकरे यांनी टिका केली आहे. आदित्य ठाकरे म्हणाले की, आपल्या राज्यात आणि देशात होणाऱ्या कोणत्याही गुंतवणुकीचे स्वागत आहेच. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी ह्यांच्या दावोस दौऱ्याचे प्लॅनिंग त्यांच्या कार्यालयाकडून योग्य प्रकारे झाले नसल्याचे दिसते. दावोस येथे २९ कंपन्यांशी सामंजस्य करार (MoUs) झाले आहेत. त्यातील फक्त १ कंपनी परदेशी आहे, उर्वरित २८ कंपन्यांचे मुख्यालय भारतात आहे. विशेष म्हणजे, ह्यातील २० कंपन्या महाराष्ट्रात असून, त्यातील १५ कंपन्या मुंबईतल्या मुख्यमंत्री कार्यालया जवळच्याच आहेत. हे लक्षात घेता प्रश्न निर्माण होतो की, ह्या कंपन्यांना सामंजस्य करार करण्यासाठी दावोसला का नेण्यात आले? दावोसमधील वेळ आंतरराष्ट्रीय नेते, कंपन्या आणि तेथील उद्योजकांशी संवाद साधण्यासाठी वापरता आला असता.
दावोस हे जागतिक स्तरावर संबंध निर्माण करण्यासाठी योग्य ठिकाण आहे. जेथे अनेक प्रतिभावान व्यक्ती आणि विविध संस्था एकत्र येतात. अशा ठिकाणी महाराष्ट्राच्या हितासाठी जगाशी संवाद साधण्याऐवजी मुख्यमंत्री राज्यातील, देशातीलच कंपन्यांमध्ये गुंतून राहण्यात काय फायदा? इतर कंपन्यांशी संपर्क करा. जागतिक घडामोडींचा अंदाज घेण्यासाठी तेथील सर्वोत्तम सेशन्सना उपस्थित रहा. 'मॅग्नेटिक महाराष्ट्र' कार्यक्रम महाराष्ट्रातच का घेता आला नाही? तो २०२२ च्या मध्यापासून झालेला नाही. हे सामंजस्य करार महाराष्ट्रातच पार पाडून जागतिक कंपन्यांना आपल्याकडे बोलावणे, उचित ठरले असते.
यासोबतच ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी असे सामंजस्य करार आपल्या राज्यात आयोजित करून जगाशी दावोससारख्या व्यासपीठावर संपर्क साधावा, अशी नम्र विनंती. तसेच, WEF सोबत चर्चा करून महाराष्ट्रात 'समर दावोस' किंवा 'मिड इयर दावोस' आयोजित करणे, हेसुद्धा एक दूरदृष्टीचे पाऊल ठरेल. मे २०२२ मध्येच आम्ही तसे प्रस्तावित केले होते. असो, गंमत अशी आहे की, अख्ख नगर विकास खाते मुख्यमंत्र्यांसोबत दावोसला, मंत्री रुसून गावी! आणि त्याच गॅंगमधले दुसरे मंत्री मुख्यमंत्र्यांनी दावोसला नेलेत. असे आदित्य ठाकरे म्हणाले.