Ashwini Bidre Murder Case : ज्या तारखेला मृत्यू ; त्याच तारखेला मिळणार न्याय
सहाय्याक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांडाप्रकरणी अखेर ११ एप्रिल रोजी आरोपींना शिक्षा सुनावली जाणार आहे. ११ एप्रिल २०१६ मध्ये घडलेल्या या हत्याकांडाची सुनावणी अलिबाग आणि पनवेल सत्र न्यायालयात सुमारे ७ वर्षे सुरू होती. या खटल्यात न्यायालयाने सुमारे ८० साक्षीदार तपासले आहेत. या हत्याकांडातील प्रमुख आरोपी बडतर्फ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकरला न्यायालयाने दोषी ठरवले आहे. कुरुंदकरसह ५ जणांना या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली होती. मृतअश्विनी बिद्रे मुळच्या कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील आळते गावामधील आहेत. अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात न्यायालयाने मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला हत्या प्रकरणी दोषी ठरवले असून महेश पळणीकर, कुंदन भंडारी या दोघांवर हत्येचे पुरावे नष्ट केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. ११ एप्रिल रोजी आरोपींना शिक्षा सुनावली जाणार आहे. न्यायालयाने यादिवशी अश्विनी बिद्रे यांची मुलगी आणि पती यांना हजर राहण्यास सांगितले आहे.
पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे यांची बडतर्फ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकरने आपल्या मीरा रोड येथील घरात ११ एप्रिल २०१६ च्या रात्री हत्या केल्याचा आरोप आहे. हत्या केल्यानंतर सहकारी राजू पाटील, कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर यांच्या मदतीने अश्विनी यांच्या मृतदेहाचे वूड कटरने लहान लहान तुकडे केले. हे तुकडे काहीकाळ फ्रीजमध्ये ठेवून नंतर ते वसईच्या खाडीत टप्याटप्याने फेकून दिले. याप्रकरणी अभय कुरुंदकरसह नंतर राजू पाटीलला पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर भंडारी आणि फळणीकर यांनाही पकडण्यात आले.