AC Local
AC Local

पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकल फेऱ्या वाढल्या

पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकल फेऱ्या वाढवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. 13 अतिरिक्त वातानुकूलित लोकल फेऱ्या सुरू करण्यात येणार असून पश्चिम रेल्वेवरील फेऱ्या 96 वरून 109 होणार आहेत.
Published by :
Team Lokshahi
Published on

पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकल गाड्यांना प्रवाशांची जास्त पसंती मिळत आहे. एसी लोकलमध्ये प्रवाशांची संख्या वाढली आहे. म्हणूनच एसी लोकलच्या फेऱ्यांची वाढती मागणी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वे प्रशासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

थोडक्यात

  • पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकल फेऱ्या वाढल्या

  • १३ अतिरिक्त वातानुकूलित लोकल फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय

  • पश्चिम रेल्वेवरील फेऱ्या ९६ वरून १०९ वर

पश्चिम रेल्वेवर वातानुकूलित लोकलमध्ये प्रवाशांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे जादा लोकल फेऱ्या चालवण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात होती. या मागणीचा विचार करून नुकतीच एक १२ डब्यांची वातानुकूलित लोकल पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात आली. तसेच २७ नोव्हेंबरपासून १३ अतिरिक्त वातानुकूलित लोकल फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकल फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९ वर पोहोचली आहे.

पश्चिम रेल्वेवर आता काही सामान्य लोकल फेऱ्यांऐवजी नवीन वातानुकूलित लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. १३ वातानुकूलित लोकल फेऱ्यांपैकी ६ अप आणि ७ डाऊन दिशेने धावतील. यामध्ये १० जलद आणि ३ धीम्या लोकल फेऱ्यांचा समावेश आहे. विरार-चर्चगेट, भाईंदर-चर्चगेटदरम्यान दोन लोकल फेऱ्या, विरार-वांद्रे, भाईंदर-अंधेरीदरम्यान प्रत्येकी एक फेरी, चर्चगेट-विरार दरम्यान दोन लोकल फेऱ्या, अंधेरी-विरार, वांद्रे-भाईंदर, महालक्ष्मी-बोरिवली आणि बोरिवली-भाईंदरदरम्यान प्रत्येकी एक लोकल फेरी धावेल. तर, शनिवार-रविवारी ५२ ऐवजी ६५ वातानुकूलित लोकल फेऱ्या चालवण्यात येतील, अशी माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com