मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग; मंत्रीपदासाठी आ. मदन येरावार, आ. डॉ. संदिप धुर्वे यांच्या नावाची चर्चा
संजय राठोड, यवतमाळ
राज्यात भाजप- शिवसेना (शिंदे गट) सरकार १० महिन्यांपासून सत्तेत आहे. या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आता पर्यंत होऊ शकला नाही. नुकताच सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला. मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींनी वेग आला आहे. मंत्रीपदासाठी आ.मदन येरावार, आ. डॉ. संदिप धुर्वे यांच्या नावाची चर्चा असून लाल दिवा कुणाला मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यवतमाळ जिल्ह्यात विधानसभा मतदारसंघांवर भाजपाचे वर्चस्व आहे. त्यामुळे या विस्ताराच्या मंत्रिमंडळात भाजप आमदार बाजी मारतील, अशी चर्चा आहे. माजी मंत्री तथा विद्यमान आ. मदन येरावार की आ. डॉ. संदिप धुर्वे यांची पक्षश्रेष्ठी वर्णी लावतात, याकडे अनेकांच्या नजरा आहेत.
यवतमाळ जिल्ह्यात भाजपचे सर्वाधिक आमदार असताना पालकमंत्री शिवसेना शिंदे गटाचे संजय राठोड आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यात भाजप आमदाराला मंत्रिपद देऊन पक्षाला अधिक बळकट करण्याची रणनीती पक्षश्रेष्ठी आखू शकतात. आमदार येरावार यांना मंत्रिपदाचा अनुभव आहे. तर आ. धुर्वे हे सातत्याने राज्याच्या राजकारणात आपल्या खास स्टाईलने चर्चेत राहतात. त्यामुळे त्यांचेही पारडे जड मानले जात आहे.