मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात; 2 जण ठार, 3 जखमी
भारत गोरेगावकर, रायगड
मुंबई गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथे शिवशाही बस आणि अर्टिगा कार यांचा मंगळवारी सकाळी भीषण अपघात झाला. समोरासमोर झालेल्या या जोरदार धडकेत कार मधील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही धडक इतकी भीषण होती की अर्टिगा कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला.
जयवंत सावंत व किरण घागे अशी मृतांची नावे आहेत. गिरीश सावंत, अमित भितळे व जयश्री सावंत हे गंभीर रित्या जखमी झाले असून त्यांच्यावर पोलादपूर येथील ग्रामीण रुग्णलयामध्ये प्राथमिक उपचार करून त्यांना तातडीने कामोठे येथील एम जी एम रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरीकांसह रेस्कू टिमच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना लगेच रुग्णालयात हलवलं.
हे सर्वजण मुंबई आणि अंबरनाथ परिसरातील राहणारे असून गणेशोत्सवासाठी कोकणात साखरपा इथं निघाले होते. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने क्रेन च्या सहाय्याने अपघात ग्रस्त वाहने बाजूला केली आहेत. पोलादपूर शहरात शिरताना सर्व्हिस रोड आणि मुंबई गोवा महामार्ग यांच्या दोन लेनमध्ये होणाऱ्या गोंधळामुळे हा अपघात झाल्याचे सांगितले जाते.