Drugs and Alcohol : धक्कादायक! भारतीयांचा सर्वाधिक खर्च औषधं आणि दारूवर; केंद्र सरकारची माहिती

Drugs and Alcohol : धक्कादायक! भारतीयांचा सर्वाधिक खर्च औषधं आणि दारूवर; केंद्र सरकारची माहिती

भारतातील सामान्य कुटुंबांचा खर्च काय असतो, हे विचारल्यावर आपल्याला जेवण, शिक्षण, घरभाडं किंवा प्रवास अशा गोष्टींचं उत्तर अपेक्षित असतं.
Published by :
Rashmi Mane
Published on

भारतातील सामान्य कुटुंबांचा खर्च काय असतो, हे विचारल्यावर आपल्याला जेवण, शिक्षण, घरभाडं किंवा प्रवास अशा गोष्टींचं उत्तर अपेक्षित असतं. मात्र, केंद्र सरकारच्या ताज्या आकडेवारीनुसार समोर आलेल्या माहितीनं अनेकांना धक्का दिला आहे. आर्थिक वर्ष 2024 मध्ये भारतीयांनी सर्वाधिक खर्च औषधं आणि दारू या दोन गोष्टींवर केल्याचं स्पष्ट झालं आहे.

औषधं आणि दारू खर्चाचे 'नवे केंद्रबिंदू'!

सरकारी आकडेवारीनुसार, 2012 पासून औषधं आणि दारू या क्षेत्रांवरील खर्च सातत्यानं वाढतच आहे. 2024 मध्ये या खर्चात तब्बल 15.7 टक्के वाढ झाल्याचं स्पष्ट झालं असून, मागील वर्षी ही वाढ फक्त 7.2 टक्के इतकी होती. याचा अर्थ असा की, गेल्या एकाच वर्षात भारतीय कुटुंबांच्या खर्चात या दोन बाबींचा वाटा मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

औषधांसोबतच इतर आरोग्यसंबंधीत गोष्टी जसं की, डॉक्टरांचे सल्ले, चाचण्या, गोळ्या, औषधोपचार उपकरणं यावरही मोठ्या प्रमाणात खर्च झाला आहे. ही वाढ केवळ आरोग्याच्या गरजांमुळे आहे का, की इतर कारणंही जबाबदार आहेत, याचा सखोल अभ्यास आवश्यक आहे.

दारूचा खर्च 'सर्वोच्च शिखरावर'

औषधांइतकाच किंबहुना कधी कधी त्याहूनही जास्त खर्च दारूवर होत असल्याचं आकडेवारी दर्शवते. 2012 पासून 2025 पर्यंत दरवर्षी या खर्चात सरासरी 0.5 टक्क्यांनी वाढ झाली आहे. विशेषतः 2024 मध्ये दारू आणि तंबाखूवरील खर्चात लक्षणीय वाढ झाली असून कपडे, बूट, चपला यांसारख्या गोष्टींवरील खर्च मात्र घटलेला दिसतो.

हॉटेलिंग आणि राहणीमानावरही खर्च वाढले

याच काळात भारतीयांनी हॉटेलिंग, पार्टी आणि जीवनशैलीशी संबंधीत सेवांवरही मोठा खर्च केल्याचं नमूद करण्यात आलं आहे. कोरोनानंतरचे सामाजिक व्यवहार आणि मानसिक ताण यामुळे लोकं अधिक सामाजिक झाले आहेत. त्याचा परिणाम दारू व हॉटेलिंगवरील खर्चात दिसून येतो.

आर्थिक धोरणांसाठी इशारा?

देशाच्या जीडीपीमध्येही या खर्चांचा वाटा वाढत चालला आहे. औषधांचा वाढता खर्च आरोग्य सेवांवरील ताण दर्शवतो. तर दारूवरील खर्च सामाजिक व वैयक्तिक आरोग्याच्या दृष्टीने चिंताजनक आहे. या आकडेवारीमधून पुढे येणारे चित्र हे केवळ आर्थिक नाही, तर सामाजिक आराखड्यासाठीही विचार करायला लावणारे आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com