Banjara Reservation : "ST आरक्षण द्या..."   
सुसाईड नोटमध्ये आरक्षणाची मागणी करत, बंजार समाजातील तरुणाचे टोकाचे पाऊल

Banjara Reservation : "ST आरक्षण द्या..." सुसाईड नोटमध्ये आरक्षणाची मागणी करत, बंजार समाजातील तरुणाचे टोकाचे पाऊल

हैदराबाद गॅझेट लागू करून मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर आता बंजारा समाजाकडूनही अशीच मागणी केली जात असताना, आता या मागणीसाठी एका तरुणाने आत्महत्या केली आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

राज्य सरकारने अलीकडेच हैदराबाद गॅझेट लागू करून मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर आता बंजारा समाजाकडूनही अशीच मागणी जोर धरत आहे. या मागणीसाठी धाराशिव जिल्ह्यातील मुरूम येथे एका तरुणाने आत्महत्या केली असून या घटनेने खळबळ उडाली आहे.

नाईकनगर येथील पवन गोपीचंद चव्हाण (वय 32 ) या तरुणाने शनिवारी सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेत जीवन संपवले. त्याच्या खिशातून सुसाईड नोट सापडली असून त्यात “हैदराबाद गॅझेटप्रमाणे बंजारा समाजालाही अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण मिळावे” अशी स्पष्ट मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे या आत्महत्येमुळे बंजारा समाजातील आरक्षणाचा मुद्दा अधिकच चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पवन चव्हाण हा लातूर येथील शाहू कॉलेजमध्ये बी.कॉम. पदवीधर होता. तो बेरोजगार होता आणि गेल्या काही दिवसांपासून आरक्षणाच्या मागणीसाठी सक्रिय होता. नुकताच त्याने जालन्यातील जिंतूर येथे गोर सेना अध्यक्ष संदेश पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनातही सहभाग घेतला होता. दोन दिवस तो तिथे राहून आपल्या समाजातील तरुणांमध्ये आरक्षणाविषयी जनजागृती करत होता. काल तो नाईकनगरला परतला होता. आज सकाळी तो पुन्हा आंदोलनात जाण्याच्या तयारीत होता. मात्र, अचानकपणे त्याने राहत्या घरातील बांबूला गळफास घेऊन आत्महत्या केली.

शेवटच्या चिठ्ठीतली मागणी

पवनच्या आत्महत्येची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक संदीपान दहिफळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासादरम्यान त्याच्या खिशातून एक चिठ्ठी मिळाली. त्यात हैदराबाद गॅझेटप्रमाणे बंजारा समाजालाही अनुसूचित जमाती प्रवर्गात आरक्षण मिळवून देण्यात यावे, अशी मागणी स्पष्टपणे नमूद केली होती. या घटनेमुळे नाईकनगर परिसरात हळहळ व्यक्त होत असून पवनच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या पश्चात आई–वडील, भाऊ आणि पत्नी असा परिवार आहे.

बंजारा समाजात संतापाची लाट

या घटनेनंतर बंजारा समाजात संतापाची लाट उसळली आहे. राज्य सरकारने तातडीने या मागणीवर ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी समाजातील नेते आणि कार्यकर्त्यांकडून पुढे येत आहे. हैदराबाद गॅझेटनुसार मराठा समाजाला मिळालेले आरक्षण पाहता बंजार समाजालाही तात्काळ आरक्षणाचा लाभ मिळायला हवा, अशी भावना व्यक्त होत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com