"१४ वर्षांपासून वनवासात होतो आता 'राम'राज्यात...", शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर अभिनेते गोविंदा यांचं मोठं विधान

"१४ वर्षांपासून वनवासात होतो आता 'राम'राज्यात...", शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर अभिनेते गोविंदा यांचं मोठं विधान

अभिनेता गोविंदा अहुजा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.
Published by :

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुर झाल्यापासून राजकीय वर्तुळात पक्षप्रवेशाचे सूर वाजू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर अभिनेता गोविंदा अहुजा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना गोविंदा यांनी मोठं विधान केलं. "एकनाथ शिंदे साहेबांचं धन्यवाद करतो. मी २००४ ते २००९ मी काँग्रेसमध्ये होतो. राजकारणातून बाहेर पडल्यावर मी पुन्हा या राजकीय दिशेला येईल, असं वाटलं नाही. १४ वर्षापासून वनवासात होतो आता रामराज्यात आलो. मला दिलेली जबाबदारी मी योग्यरितीनं पार पाडेल", असं गोविंदा म्हणाले.

मुख्यमंत्र्यांमुळे मुंबईचा कायापालट झाला आहे. फार वर्षांपूर्वी जी मुंबई पाहिली होती, ती आता खूप सुंदर झाली आहे. महाराष्ट्र संतांची भूमी आहे. शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर मुंबईचं सुशोभीकरण वाढलं. पंतप्रधान मोदींप्रमाणे शिंदेंची प्रतिमा स्वच्छ आहे, असंही गोविंदा म्हणाले. शिंदेंच्या शिवसेनेत गोविंदा अहुजा यांचां पक्षप्रवेश झाला असून मुंबईच्या उत्तर पश्चिम मतदारसंघातून गोविंदा यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. परंतु, गोविंदा आमच्यासाठी स्टार प्रचारक म्हणून काम करतील, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. शिंदे पुढे म्हणाले, शिवजयंतीच्या पवित्र दिनी सर्वांचे लोकप्रिय अभिनेते यांचं मी शिवसेनेत मनापासून स्वागत करतो. सर्वांना आवडणारे आणि सर्वच समाजात लोकप्रिय असलेले गोविंदा यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो.

मुंबईकरांना अपेक्षित असं काम सुरु आहे. प्रदुषण कमी होत आहे. महाराष्ट्रात विकासाची कामे जोरात सुरु आहे. विकासाच्या मुद्द्यावर आणि कामांवर प्रभावित होऊन गोविंदा आमच्यासोबत आले आहेत. कोणतीही अट न ठेवता ते आमच्यासोबत आले आहेत. अयोध्येत राम मंदिर व्हावं अशी बाळासाहेब ठाकरेंची ईच्छा होती. ती आता पूर्ण झाली आहे. आता सर्व ठिकाणी गोविंदा गोविंदाच सुरु आहे. आपलं सरकार आल्यानंतर पहिला निर्णय आम्ही 'गोविंदां'चा घेतला. त्यांना आमचा स्वभाव आवडला, मोदी साहेबांचा विचार आवडला. फिल्म इंडस्ट्रीसाठी त्यांना काम करायचं आहे. गोविंदांना स्टार प्रचारक म्हणून काम करायचं आहे. आमचं सरकार आल्यावर सण आणि उत्सव सुरु झाले.

गोविंदांना ऐकण्यासाठी लाखो लोकांची गर्दी होईल. गोविंदा यांना संसदीय कामकाजाचा अनुभव आहे, त्यांचा मुंबईतल्या कोणत्या मतदारसंघात विचार होऊ शकतो, या प्रश्नाचं उत्तर देताना शिंदे म्हणाले, ते निवडून आणण्याचं काम करणार आहेत. कलावंत आहे, कलाकाराचा कधी अपमान करु नये. माणसाचे दिवस कधी फिरतात, ते माहित पडत नाही. एका कलाकाराचा अपमान म्हणजे संपूर्ण चित्रपटसृष्टीचा अपमान आहे. जे बोललेत त्यांना भोगावं लागेल. काल विजय शिवतारे आले होते. त्यावेळी दोन्ही उपमुख्यमंत्री तिथे होते. शिवतारे यांनी सांगितलं, पक्षाचा आदेश माझ्यासाठी अंतिम आहे. त्यामुळे मी त्यांचं धन्यवाद करतो, असंही शिंदे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com