तुमच्याकडे काय आहे चिखलच ना? सामनातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी लोकसभेत आणि गुरूवारी राज्यसभेत विरोधकांच्या टीकेला प्रतिउत्तर देत भाषण केले. गौतम अदाणी प्रकरणावर पंतप्रधान का बोलत नाहीत? असा प्रश्न विचारणाऱ्या विरोधकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी उत्तर दिलं. त्यांच्या या भाषणावर शिवसेनेचा अग्रलेख सामनातून हल्लाबोल करण्यात आला आहे. सामनातून म्हटले आहे की, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपासून राहुल गांधी यांचा भाजपा समर्थकांनी केलेला उपमर्द, हेटाळणी याला चिखल नाही म्हणायचे तर काय म्हणायचे? गुरूवारच्या भाषणात एके ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की नेहरू जर महान होते तर त्यांच्या वारसांना नेहरू हे आडनाव लावण्याची लाज का वाटते? हा पण पंतप्रधांनांनी उधळलेला गुलाल होता का? अदाणी प्रकरणावरचं मौन हा तुम्हाला गुलाल वाटत असेल तर काय बोलायचे? केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून होणारी मुस्कटदाबी, इतर पक्षांना संपवण्याचे प्रयत्न हा तुमच्या हाती असलेला चिखलच आहेत. असे सामनातून म्हटले आहे.
यासोबतच म्हटले आहे की, त्या भाषणात त्यांनी अदाणीचा अ देखील उच्चारला नाही. काँग्रेस पक्ष, गांधी, नेहरू घराणे, आधीच्या काँग्रेस सरकारवरची टीका याभोवतीच मोदी यांचे भाषण फिरत राहिले. एके ठिकाणी त्यांनी चिखल आणि कमळ याचा उल्लेख केला. किचड उनके पास था, मेरे पास गुलाल! जो भी जिसके पास था उसने दिया उछाल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या शायराना अंदाजात सांगितले. तुम्ही जेवढा जास्त चिखल उडवाल तेवढे कमळ अधिक फुलेल या आशयाचं वाक्यही त्यांनी भाषणात वापरलं. असे म्हणत सामनातून टीका करण्यात आली आहे.
चिखल आणि कमळ हे तुम्ही बोललात ते यमक जुळवायला, टाळ्या वाजवायला ठीक आहे पण तुम्ही तुमच्या भाषणात गांधी नेहरू घराणे, काँग्रेस आणि आधीची काँग्रेस सरकारे यांच्याविषयी जे बोललात ते काय होते? तुमच्याजवळ गुलाल होता जो तुम्ही उधळला अशी बढाई मारलीत पण तुमच्या जवळही चिखलच होता तोच तुम्ही फेकला. काँग्रेस पक्षाच्या संदर्भात परकिय विद्यापीठात झालेल्या कुठल्या तरी संशोधनाचा तुम्ही केलेला उल्लेख हा कोणत्या गुलालाचा प्रकार होता? एकीकडे हिंदुस्थानाची उभारणी अनेक पिढ्यांच्या श्रमातून आणि घामातून झाली असे सांगायचे आणि दुसरीकडे आधीच्या सरकारांनी वाटोळे केले असे सांगायचे. पंडित नेहरू महान होते म्हणायचे आणि दुसरीकडे नेहरू गांधी घराण्याच्या नावाने बोटेही मोडायची. असे म्हणत सामनातून हल्लाबोल करण्यात आला आहे.