Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या निधीबाबत आदिती तटकरे यांची मोठी घोषणा
थोडक्यात
लाडकी बहीण योजनेबाबत सरकारची मोठी घोषणा
ऑगस्ट महिन्यांचा हफ्ता महिलांच्या खात्यावर जमा झाला नाही.
राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी आपल्या अधिकृत ‘एक्स’खात्यावरून महत्त्वाची घोषणा केली
राज्य सरकारने कमी उत्पन्न गटातील महिलांसाठी सुरू केलेली ‘लाडकी बहीण’ योजना सध्या चर्चेचा विषय बनली आहे. या योजनेचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना थेट आर्थिक पाठबळ देण्याचा आहे. ज्यांच्या घराचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांच्या खाली आहे, अशा महिलांना या उपक्रमातून दर महिन्याला ₹1500 ची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होते. मात्र, ऑगस्ट महिन्याचा अखेर होऊन देखील या महिन्याचा निधी लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झालेला नव्हता, त्यामुळे हजारो महिलांमध्ये नाराजीचं वातावरण होतं. अनेकांनी सोशल मीडियावर यासंदर्भात प्रश्न उपस्थित केले होते.
यासंदर्भात आता राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी आपल्या अधिकृत ‘एक्स’खात्यावरून महत्त्वाची घोषणा केली आहे. त्यांनी नमूद केलं आहे की, “लाडकी बहीण योजनेचा मानधन निधी लाभार्थी महिलांच्या खात्यांत आजपासून जमा केला जाईल.” या घोषणेमुळे हजारो लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.
ही योजना सुरू करताना शासनाने काही निकष देखील निश्चित केले होते. उदा. ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांना या योजनेपासून वगळण्यात आलं आहे. तसेच, 65 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या महिलांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही. प्रत्येक कुटुंबातील फक्त दोन महिलांनाच या योजनेचा फायदा घेता येईल, अशी मर्यादा देखील ठेवण्यात आली आहे. दरम्यान, काही ठिकाणी अपात्र महिलांनी बनावट माहितीच्या आधारे या योजनेचा लाभ घेतल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे शासन यंत्रणा आता अशा नावांची छाननी करत असून, अयोग्य लाभार्थ्यांची नावे योजनेतून हटवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. येत्या काळात लाभ फक्त पात्र महिलांनाच मिळावा यासाठी शासन अधिक काटेकोर पावले उचलत आहे. ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे राज्यातील हजारो महिलांना आर्थिकदृष्ट्या मदतीचा हात मिळत असून, गरजूंसाठी ही योजना आश्वासक ठरत आहे.
आदिती तटकरे या पोस्टमध्ये लिहितात की,
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती !
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आज पासून सुरुवात होत आहे.
महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे. लवकरच या योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे.