सिनेट निवडणूक स्थगित, आदित्य ठाकरेंची टीका; मुख्यमंत्री डरपोक, घाबरता कशाला?
मुंबई विद्यापीठाची पदवीधर सिनेट निवडणूक अचानक स्थगित झाली आहे. 9 ऑगस्ट रोजी मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीचा कार्यक्रम मुंबई विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आला होता. मात्र आता हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. मुंबई विद्यापीठाने पदवीधर मतदारसंघासाठी जाहीर करण्यात आलेल्या सिनेट निवडणुकीला पुढील आदेश मिळेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. याच पार्श्व़भूमीवर माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्थानिक आणि लोकसभा निवडणुकीसारखं मुख्यमंत्री सिनेट निवडणुकीला देखील घाबरले, असा टोला लगावला आहे.
काय म्हणाले आदित्य ठाकरे?
गुरुवारी रात्री 11 वाजता सिनेट निवडणुकांचे पत्र समोर आले. सिनेट निवडणूक पुढील आदेश मिळेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. आमचा 100 टक्के निकाल लागणार होता. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आणि नंतर स्थगित झाला. मणिपूरसारखे वातावरण येथे नाही, भांडण नाही,वाद नाही. सव्वा लाख मतदारांनी यामध्ये नाव नोंदविले आहे. मग अस काय घडलं? ही निवडणूक स्थगित का झाली? असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला आहे.
दोन पक्ष फोडले, दोन परिवार फोडले. महाशक्ती सोबत असून निवडणुकीला घाबरतात का? लोकसभेला देखील असेच करण्याची शक्यता आहे. लोकसभेला देखील निवडणुका जाहीर करतील आणि मग स्थगित करतील. सिनेट तुमचे सरकार पाडणार नाही तुमचे सरकार तर आम्हीच पाडणार आहोत. त्यांची तयारी पूर्ण आहे की नाही माहीत नाही पण तयारी नसेल म्हणून असे झाले असेल, अशी सडकून टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.