मी वरळीतून राजीनामा देतो, तुम्ही राजीनामा देऊन वरळीतून उभे राहा, कसे निवडून येताय, ते मी बघतोच; आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना चॅलेंज
शिवसेना दोन गटांत विभागली गेली. एक शिंदे गट आणि दुसरा ठाकरे गट. दोन्ही गटांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरु असतात. आदित्य ठाकरे वारंवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवडणुका घेण्यासाठी आव्हान देत असतात. नुकतेच आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ओपन चॅलेंज दिले आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले की, "जी यंत्रणा लावायचीये लावा, जी ताकद लावायचीये लावा, जेवढे खोके वाटायचेयत वाटा, पण एकही मत विकलं जाणार नाही. एकही शिवसैनिक विकला जाणार नाही. "पाडणारच... पाडणारच... पण काय आहे मुख्यमंत्री आहेत ना, सध्या हातात ताकद आहे. म्हणून म्हणतोय वरळीत या. तसे प्रत्येक आठवड्यात येत असतात ते लपून छपून येतात. कुठेतरी नारळ फोडण्याचा प्रयत्न करतात. असे आदित्या ठाकरे म्हणाले आहेत.
पुढे ते म्हणाले की, "महाराष्ट्राचे 13 खासदार आणि 40 आमदार ज्यांनी गद्दारी केली आहे. त्यांना आज मी चॅलेंज देतोय. तुम्ही तुमच्या आमदारकीचा, खासदारकीचा राजीनामा द्या आणि पुन्हा निवडून कसे येता, ते दाखवाच. मी तर या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनाही चॅलेंज दिलंय. मी वरळीतून राजीनामा देतो, तुम्ही माझ्यासमोर वरळीतून उभे राहा, तुम्ही कसे निवडून येताय, ते मी बघतो." असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना ओपन चॅलेंज दिले आहे.