आदित्य ठाकरेंच्या औरंगाबादच्या सभेला परवानगी मिळाली
शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे यांच्या सिल्लोड येथील सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली होती मात्र मोठ्या वादानंतर आता 7 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सिल्लोडच्या सभेला अखेर परवानगी मिळाली आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांच्याही सभेला परवानगी दिलेली आहे.
आदित्य ठाकरे यांच्या सभेसाठी सिल्लोड येथील महावीर चौकात सभेची परवानगी मागितली होती. तसेच 7 नोव्हेंबरला श्रीकांत शिंदे यांच्या सभेसाठी सिल्लोड येथील जिल्हा परिषद मैदानाची परवानगी शिंदे गटाकडून मागितली गेली आहे. मात्र, दोन्ही सभा स्थळ जवळ जवळ होत असल्याचे दिसून येत असल्याने पोलिसांनी ठाकरे गटाची परवानगी नाकारली होती. मात्र पोलिसांनी आंबेडकर चौकाजवळील मोकळ्या जागेत आदित्य ठाकरे यांना सभा घेण्यास परवानगी दिली आहे. पण ठाकरे गटाची यावर अजून कोणतेही प्रतिक्रिया आलेली नाही.
शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघात सोमवारी आदित्य ठाकरे सभा घेणार आहेत. तर, याठिकाणी आदित्य ठाकरेंविरोधात श्रीकांत शिंदेही मैदानात उतरले असून सोमवारीच म्हणजेच 7 नोव्हेंबर रोजी सिल्लोड दौरा करणार आहेत. यामुळे महाराष्ट्रातील आजी-माजी मुख्यमंत्र्यांच्या सुपुत्रांमध्ये सामना रंगण्याची चिन्हे आहेत.