Aaditya Thackeray : 'महाराष्ट्र हितासाठी सोबत येणाऱ्यासोबत आम्ही राहू'; आदित्य ठाकरेंचा मनसेला इशारा
महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन समीकरणं येत्या काळात पाहायला मिळतील, असे संकेत काही दिवसांपूर्वी झालेल्या चर्चांमुळे दिसून येत होते. यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले होते. या चर्चेची सुरूवात दोन्ही ठाकरे बंधूंच्या सुचक विधानांमुळे झाली होती. दरम्यान, याच युतीबाबत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये आपले मत व्यक्त केले आहे. त्यांनी आमचं राजकारण सेटिंगचं नाही, असा अप्रत्यक्ष टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लगावला आहे.
महाराष्ट्र हितासाठी सोबत येणाऱ्यासोबत आम्ही राहू. आमचं राजकारण सेटिंगचं नाही. स्वच्छ दिलाने एकत्र येण्याचा विचार आम्ही करतोय, असे आदित्य ठाकरे प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले. सेटिंगचं राजकारण असा उल्लेख करत त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. त्यामुळे येत्या काळात मनसेकडून याला काय उत्तर येईल, हे पाहणं औस्तुक्याचं ठरणार आहे.