Raj - Uddhav Thackeray : 11 वर्षांनी ठाकरे बंधू बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी एकत्र
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
आज स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा13 वा स्मृतिदिन आहे आणि त्यानिमित्ताने अगदी राज्यभरातून शिवसैनिक सकाळी सात वाजल्यापासून दादर येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर (Balasaheb Thackeray Memorial) अभिवादन करण्यासाठी येत आहेत. दरम्यान, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सहकुटुंब अभिवादन करण्यासाठी पोहोचले. यानंतर बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) देखील बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यांच्यासोबत आदरांजली वाहिली.
बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन केल्यानंतर उद्धव ठाकरे, राज ठाकरे, आदित्य ठाकरे, चंदू मामा, रश्मी ठाकरे एकत्र स्मृतीस्थळी थोडावेळ बसले. गेल्या अनेक महिन्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अनेकवेळा एकत्र दिसले. तसेच दिवाळी, भाऊबीजसह अनेक कार्यक्रमात ठाकरे कुटुंबही एकत्र आले होते. परंतु राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे 11 वर्षांनंतर दादरमधील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी एकत्र दिसले. यावेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची काहीवेळ चर्चाही झाली. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना एकत्र बघता उपस्थित शिवसैनिक भावनिक झाल्याचंही दिसून आले.
संजय राऊतही बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर पोहोचले
प्रकृतीच्या कारणास्तव संजय राऊत यांनी 31 ऑक्टोबरपासून घराबाहेर पडणे पूर्णपणे बंद केले होते. मात्र, आज बाळासाहेब ठाकरे यांचा 13 वा स्मृतीदिन असल्याने त्यांना राहावले नाही आणि ते बाळासाहेबांच्या स्मारकाचे दर्शन घ्यायला घराबाहेर पडले. शर्ट-पँट अशा पेहरावात ते शिवाजी पार्कवर दाखल झाले. यावेळी संजय राऊत यांच्या तोंडाला संसर्ग टाळण्यासाठी मास्क लावलेला होता. शिवाजी पार्कच्या परिसरात गाडीतून उतरल्यानंतर संजय राऊत हे त्यांचे बंधू सुनील राऊत यांचा हात पकडून बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळापर्यंत चालत गेले आणि लाडक्या साहेबांचे दर्शन घेतले.
