Santosh Ladda Case : तब्बल 19 दिवसांनी लड्डा यांनी दिल्या दागिन्यांच्या पावत्या; खोतकरकडून सोन्याचा व्यवहार उघड

Santosh Ladda Case : तब्बल 19 दिवसांनी लड्डा यांनी दिल्या दागिन्यांच्या पावत्या; खोतकरकडून सोन्याचा व्यवहार उघड

लड्डा यांनी अखेर चोरीला गेलेल्या दागिन्यांच्या पावत्या तपास अधिकाऱ्यांकडे सादर केल्या असून, आता पोलीस त्यांची सखोल तपासणी करणार आहेत.
Published by :
Rashmi Mane
Published on

बजाज नगरातील प्रतिष्ठित उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरात तब्बल साडेपाच किलो सोने, 32 किलो चांदी आणि रोख रक्कम असा मोठा ऐवज लंपास करणाऱ्या दरोड्याला आता19 दिवस उलटले असले तरी तपासाला गती येत असल्याचे संकेत मिळत आहेत. मंगळवारी (3 जून) सायंकाळी लड्डा यांनी अखेर चोरीला गेलेल्या दागिन्यांच्या पावत्या तपास अधिकाऱ्यांकडे सादर केल्या असून, आता पोलीस त्यांची सखोल तपासणी करणार आहेत.

दरम्यान, या गुन्ह्यात एनकाउंटरमध्ये ठार करण्यात आलेल्या आरोपी अमोल खोतकरने नांदेडमधील एका व्यक्तीला काही प्रमाणात सोने सुपूर्द केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता चोरी गेलेल्या सोन्याचा माग काढण्यासाठी पोलिसांची दोन पथके नांदेड आणि अंबाजोगाई येथे रवाना झाली आहेत. अंबाजोगाईतील अटक आरोपीला तपासासाठी पोलिसांनी सोबत नेले आहे.

संतोष लड्डा यांच्या बजाज नगरमधील घरात पडलेल्या या धक्कादायक दरोड्यात गुन्हेगारांनी घराचा कोपरान् कोपरा धुंडाळून सुमारे 5.5 किलो सोने, 32 किलो चांदी, आणि 70 हजारांची रोख रक्कम चोरून नेली होती. या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ माजवली होती. पोलिसांनी झपाट्याने तपास सुरू करताना अनेकांना ताब्यात घेतले. काहीजण फरार होते, तर काहींच्या मुसक्या आवळण्यात आल्या.

परंतू दागिन्यांच्या पावत्यांचा अभाव तपासाला अडथळा ठरत होता. अखेर तब्बल 19 दिवसानंतर लड्डा यांनी पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांची भेट घेत दागिन्यांच्या पावत्या त्यांच्याकडे सुपूर्द केल्या. "पावत्या मिळाल्या असून त्यांची लवकरच पडताळणी केली जाईल. यावरून चोरी गेलेल्या ऐवजाचे अचूक मूल्य आणि स्वरूप समजेल," अशी माहिती निरीक्षक पवार यांनी दिली.

दरम्यान, तपास अधिकाऱ्यांना मिळालेल्या प्राथमिक माहितीवरून, अमोल खोतकर याने दरोड्यानंतर काही प्रमाणात चोरीचे सोने नांदेड येथील एका ओळखीच्या व्यक्तीकडे सुपूर्द केल्याचे समोर आले आहे. या माहितीच्या आधारे एक पथक नांदेडला रवाना झाले असून, दुसरे पथक अंबाजोगाईमध्ये तपासासाठी पाठवण्यात आले आहे.

या तपासाच्या संदर्भात पोलिसांनी अटक केलेल्या अंबाजोगाई येथील आरोपी सुरेश गंगणे याला सोबत नेले आहे. गंगणे याच्यासोबतच त्याची पत्नी बबिता व सासरे कांबळे यांनाही अटक करण्यात आली होती. ३ जून रोजी न्यायालयात हजर करताना या दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com