Chandrakant Khaire On Nishikant Dubey : निशिकांत दुबे यांच्या वक्तव्यावरून चंद्रकांत खैरे संतापले, म्हणाले, "आमच्या पैशांवर तुमचं झारखंड आणि..."
झारखंडमधील भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी मुंबईतील हिंदी भाषिकांवरून ठाकरे बंधूंना डिवचलं आहे. त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापवलं आहे. दुबे यांनी एक्स या सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये ठाकरे बंधूंना थेट ‘कुत्रा-वाघ’ अशा शब्दांत आव्हान दिलं होतं.
त्यांच्या या वक्तव्यावर आता ठाकरे पक्षाचे नेते आणि छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं की, "निशिकांत दुबे यांनी अतिशय खालच्या पातळीचं आणि चुकीचं विधान केलं आहे. त्याला माहित आहे मी कसा आहे आणि तो कसा आहे. तू तुझं झारखंड पाहा, महाराष्ट्रात कशाला डोके घालतोस? दोन्ही ठाकरे भाऊ एकत्र आले म्हणून तुझ्या पोटात दुखतंय का?" त्यांनी पुढे म्हटलं, "महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक महसूल केंद्र सरकारला देणारं राज्य आहे.
आमच्या पैशांवर तुमचं झारखंड आणि केंद्र सरकार चालतं का नाही, याचा विचार करा. झारखंडमधल्या खाणीत किती भ्रष्टाचार आहे, हे मला माहीत आहे. तिथं कोण कोण गुंतलं आहे, ते देखील मला माहिती आहे." खैरे यांनी भाजपवरही टीका करत म्हटलं की, "भाजपने मुद्दामून निशिकांत दुबे सारख्या लोकांना आमच्या अंगावर सोडून महाराष्ट्रात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. दोन्ही ठाकरे भाऊ एकत्र येत आहेत, म्हणून यांचं पोट दुखत आहे. त्यामुळे ते असं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत."
महाराष्ट्रात परप्रांतीयांविषयी नेहमीच सहिष्णुता दाखवण्यात आली आहे, असं सांगत खैरे म्हणाले, "महाराष्ट्रात झारखंडचे लोक राहतात आणि आम्हाला त्यांच्या बद्दल सहानुभूती आहे. पण तुम्ही जास्त उलटसुलट बोलू नका. इथं राहणारे हिंदी भाषिक लोक मराठीत बोलायला हवं, त्यासाठी आम्ही सांगितलं तर त्यांना मिरची का लागते? तुम्ही इथे एवढे वर्ष राहता, तर मराठी बोलणं शिकायला हवं. आम्ही तुम्हाला मराठी येत नाही म्हणून मारत नाही, पण मराठीचा अपमान करता म्हणून मारतो." तसंच, भाजप नेत्यांना थेट इशारा देताना खैरे म्हणाले, "भाजपने कुणाला सोडायचं किंवा कुणाला अंगावर पाठवायचं हे योग्य नाही.
तुम्ही प्रसाद लाडला सोडाल किंवा आणखी कुणाला सोडाल, ते आम्ही पाहू, पण कोणीही असं बोलणं चुकीचं आहे. आमच्या अंगावर चाललात, तर आम्हीही कशाला सोडणार?" या संपूर्ण वादामुळे महाराष्ट्रातील स्थानिक विरुद्ध परप्रांतीय असा जुना मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसेच्या भूमिकांमुळे हिंदी भाषिकांमध्ये अस्वस्थता आहे, तर दुसरीकडे भाजप या प्रकरणातून महाराष्ट्रात राजकीय लाभ मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप विरोधकांकडून होतो आहे. सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू असून, अशा वादग्रस्त मुद्द्यांमुळे राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.