Car Blast in Islamabad, Pakistan : दिल्लीनंतर आता पाकिस्तानच्या इस्लामाबाद हायकोर्टाबाहेर कारमध्ये भीषण स्फोट; मृतांच्या संख्येत गंभीर वाढ
नुकताच दिल्लीमधील लाल किल्ला परिसरात एका कारमध्ये मोठा स्फोट झाला. हा स्फोट एवढा मोठा होता की, लाल जैन मंदिर आणि दुकानांच्या काचाही फुटल्या. ज्या ठिकाणी हा स्फोट झाला ते ठिकाण लाल किल्ल्यापासून फक्त 800 मिटर अंतरावर आहे. त्यामुळे या स्फोटाकडे संशयाच्या नजरेतून पाहिलं जात आहे. या स्फोटात सुमारे 8 जणांचा मृत्यू, 20 हून अधिक जखमी झाले.
या स्फोटामागचा शोध अद्याप सुरु असून यामुळे संपूर्ण जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. यानंतर आता पाकिस्तानातून मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तानमधील इस्लामाबाद हायकोर्टाबाहेर कारमध्ये भीषण स्फोट झाला आहे. कोर्ट परिसरातील पार्किंग एरियामध्ये उभ्या असलेल्या कारमध्ये सिलिंडरचा स्फोट झाल्याने ही दुर्घटना घडली आहे. या स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाला असून 20 ते 25 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी आजूबाजूचा परिसर सील केला आहे आणि प्राथमिक तपास सुरू केला आहे.
दरम्यान तिथे उपस्थित स्थानिक पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, कोर्ट परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी आणि गर्दी असताना हा मोठा स्फोट झाला. या स्फोटात अनेक वकील आणि नागरिक जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेने आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून याबाबत अधिकची माहिती शोधली जात आहे.

