Raj Thackeray : एक वाक्य, मोठा वाद! “जेलमधून सुटल्यासारखं वाटतं” म्हणत राज ठाकरेंनी राऊतांना सुनावलं
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे शिवसेना भवनात दाखल झाले असून दोन्ही पक्ष मिळून वचननामा जाहीर केला. यादरम्यान राज ठाकरे यांनी मोठे विधान केले. राज ठाकरे 20 वर्षानंतर सेना भवनात दाखल झाले आहेत. जवळपास दोन दशकांनंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे शिवसेना भवनात आले. या वेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर दिसले. मुंबई महापालिकेसाठी दोघांनी मिळून संयुक्त वचननामा सादर केला.
यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, नव्या शिवसेना भवनात येण्याचा हा त्यांचा पहिलाच प्रसंग आहे. जुन्या शिवसेना भवनाशी अनेक आठवणी जोडलेल्या असून नव्या इमारतीत काय कुठे आहे, हे अजून समजत नसल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांनी संजय राऊत यांच्यावर हलक्याफुलक्या शब्दांत टोला लगावत, वीस वर्षांनी इथे आल्याचं सतत सांगितलं जात असल्याने आपल्याला तुरुंगातून बाहेर आल्यासारखं वाटत असल्याचं म्हटलं.
जुन्या शिवसेना भवनातील अनुभव आठवताना राज ठाकरे भावूक झाले. त्या काळातील अनेक प्रसंग आजही लक्षात असल्याचं त्यांनी सांगितलं. 1977 साली शिवसेना भवन सुरू झाल्यानंतर झालेल्या सभेनंतर दगडफेक झाली होती, त्या दिवसापासूनच्या आठवणी मनात कोरल्या गेल्याचं त्यांनी नमूद केलं.
शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एकत्रित जाहीरनामा आज प्रसिद्ध झाला आहे. या वचननाम्यातील मुद्द्यांची माहिती आधीच आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी दिल्यामुळे पुन्हा त्यावर सविस्तर चर्चा करण्याची गरज नसल्याचं राज ठाकरे म्हणाले.
दरम्यान, संजय राऊत यांनी या घडामोडीचं महत्त्व सांगताना म्हटलं की, आज एक वेगळं आणि ऐतिहासिक चित्र पाहायला मिळत आहे. राज आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र आल्याने सर्व कार्यक्रम संयुक्तपणे होत आहेत. सभा, पत्रकार परिषद, मुलाखती आणि वचननामा सगळं एकत्र आहे. शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादीची ही एकजूट महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाची ठरणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

