लाडकी बहिणनंतर आता लेक लाडकी योजनेचे पैसे येण्यास सुरुवात
राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरली. लोकसभा निवडणुकीनंतर लाडकी बहिण योजनेमुळे महायुतीने जोरदार कमबॅक केलं. महायुतीला राज्यामध्ये घवघवीत यश मिळालं. त्यानंतर राज्यात सत्तास्थापनेनंतर मंत्रिमंडळ विस्तारानंतर राज्यातील तमाम महिला वर्गाला दिलेलं आश्वासन महायुती सरकारने पूर्ण केलं. महिलांच्या खात्यात लाडकी बहिण योजनेचा डिसेंबर महिन्याच्या हफ्त्याचे पैसे जमा झाले. त्यानंतर आता लेक लाडकी योजनेचेही पैसे वाटप करण्यात येत आहेत.
अमरावतीत लेक लाडकी योजनेचा पहिला हप्ता खात्यात वर्ग करण्यात आला आहे. 6 हजार 584 मुलींच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. प्रत्येकी 5 हजारप्रमाणे 3 कोटी 17 लाख डीबीटी प्रणालीद्वारे जमा करण्यात आले आहेत. अनुदान वितरणात अमरावती जिल्हा अव्वल ठरला आहे.
काय आहे ही योजना?
लेक लाडकी योजना 2024 (Lek Ladki Yojna 2024): अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील मुलींना जन्मापासून ते मुलीच्या 18 वर्षे वयापर्यंत एकूण 1 लाख 1 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. मुलींच्या शिक्षण, आरोग्य आणि सर्वांगीण विकासासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.
काय आहेत योजनेची उद्दिष्टे?
मुलीच्या जन्मास प्रोत्साहन देवून मुलींचा जन्मदर वाढविणे.
मुलींच्या शिक्षणास चालना देणे.
मुलींचा मृत्यू दर कमी करणे व बालविवाह रोखणे.
कुपोषण कमी करणे.
शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्यवर आणण्यासाठी प्रोत्साहित करणे.
योजनेसाठी पात्रता:
लेक लाडकी योजना ही योजना पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबामध्ये दिनांक १ एप्रिल, २०२३ रोजी वा त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना लागू राहील. तसेच, एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील.
पहिल्या अपत्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करतेवेळी माता/पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील.
तसेच, दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील. मात्र त्यानंतर माता / पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील.
दिनांक १ एप्रिल, २०२३ पूर्वी एक मुलगी / मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना (स्वतंत्र) ही योजना अनुज्ञेय राहील. मात्र माता / पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील.
लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक आहे.
लाभार्थी बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे.
लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रुपये १ लाखापेक्षा जास्त नसावे.
कुणाला मिळणार योजनेचा लाभ?
पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबात मुलीच्या जन्मानंतर ५ हजार रुपये
इयत्ता पहिलीत ६ हजार रुपये
सहावीत ७ हजार रुपये,
अकरावीत ८ हजार रुपये
लाभार्थी मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला ७५ हजार रुपये याप्रमाणे एकूण रुपये १,०१,०००/- एवढी रक्कम देण्यात येईल.
आवश्यक कागदपत्रेः
लाभार्थीचा जन्माचा दाखला
कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न १ लाखपेक्षा जास्त नसावे.) याबाबत तहसिलदार / सक्षम अधिकारी यांचा दाखला आवश्यक राहील.
लाभार्थीचे आधार कार्ड (प्रथम लाभावेळी ही अट शिथील राहील)
पालकांचे आधार कार्ड
बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत
रेशनकार्ड (पिवळे अथवा केशरी रेशन कार्ड साक्षांकित प्रत)
मतदान ओळखपत्र (शेवटच्या लाभाकरिता १८ वर्ष पूर्ण झाल्यांनतर मुलीचे मतदार यादीत नाव असल्याचा दाखला)
संबधित टप्प्यावरील लाभाकरिता शिक्षण घेत असल्याबाबतचा संबंधित शाळेचा दाखला (Bonafied)
कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र (“अ” येथील अटी शर्तीमधील क्रमांक २ येथील अटीनुसार)
अंतिम लाभाकरिता मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक राहील, (अविवाहीत असल्याबाबत लाभार्थीचे स्वयं घोषणापत्र)
कसा कराल अर्ज?
लेक लाडकी (Lek Ladki Yojana) योजनेच्या लाभार्थीची पात्रता पडताळणी करण्याची जबाबदारी ही अंगणवाडी सेविका, संबंधित पर्यवेक्षिका / मुख्यसेविका यांची राहील. अंगणवाडी सेविका / पर्यवेक्षिका / मुख्यसेविका यांनी लाभार्थी पात्रतेची खातरजमा करुन ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्याचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करावा. सक्षम अधिकारी यांनी या कामकाजावर नियंत्रण ठेवावे. त्यानुसार सदर योजनेकरिता अंगणवाडी सेविका / पर्यवेक्षिका / मुख्यसेविका व सक्षम अधिकारी यांच्या जबाबदा-या खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येत असून त्यामध्ये आवश्यकतेनुसार आयुक्तालय स्तरावरून सुधारणा करण्यात येतील.