Amit Thackeray On Maratha Protest :
जरांगेंनी केलेल्या राज ठाकरेंच्या टीकेनंतर अमित ठाकरेंनी केली मराठा आंदोलकांसाठी 'ती' पोस्ट

Amit Thackeray On Maratha Protest : जरांगेंनी केलेल्या राज ठाकरेंच्या टीकेनंतर अमित ठाकरेंनी केली मराठा आंदोलकांसाठी 'ती' पोस्ट

मराठा आंदोलनादरम्यान बोलताना मनोज जरांगेंनी राज ठाकरेंवर कुजक्या कानाचा म्हणत टीका केली होती. यावर आता अमित ठाकरेंनी मराठा आंदोलकांसाठी पोस्ट केली आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे. आज या उपोषणाचा चौथा दिवस असून मोठ्या संख्येने मराठा बांधव आंदोलनात सहभागी झाले आहेत.

29 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे हजारो समर्थकांसह मुंबईत दाखल झाले. गेल्या काही दिवसांपासून आझाद मैदानावर आलेल्या आंदोलकांना जेवण-पाण्याची मोठी गैरसोय भासत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान जरांगेंनी राज ठाकरेंवर निशाणा साधत म्हटलं होत की, "विधानसभा लोकसभा दोन्हीकडे फडणवीसांनी तुमचा गेम केला. तरी तुम्ही फडणवीसांचे गुणगान गातात का? त्यांच्या घरात फडणवीस चहा पिऊन गेला की हे बदलले. आमच्या गावाकडे त्याला कुजक्या कानाचा म्हणतात".

याच पार्श्वभूमीवर मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत कार्यकर्त्यांना विशेष आवाहन केले आहे. त्यांनी आंदोलकांना अन्न-पाणी पुरवण्याचे निर्देश दिले असून, मराठा बांधवांच्या अडचणी कमी करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन मनसैनिकांना केले आहे.

अमित ठाकरेंनी फेसबुकवर पोस्ट टाकत लिहले आहे -

माझ्या प्रिय महाराष्ट्र सैनिकांनो,

सध्या आपल्या मुंबईत राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले हजारो मराठा बांधव आंदोलनासाठी जमले आहेत. मराठा आरक्षण हा विषय शासनाच्या हाती आहे, त्याचा निकाल काय लागेल हे काळ सांगेल. पण एवढं मात्र नक्की, आज जे इथे उभे आहेत ते आपले बांधव आहेत.

हे शेतकरी आहेत, मजूर आहेत, लहानशा जमिनीवर पोट सांभाळणारे आहेत, शिक्षणासाठी धडपडणारे युवक आहेत.... म्हणजेच मराठा समाजातील प्रत्येक स्तरातील, प्रत्येक जीवन जगणारी आपलीच माणसं आहेत.

ते आपल्या घरापासून, गावापासून, शेतापासून दूर येऊन इथे आंदोलन करीत आहेत. त्यांना काही कमी पडू नये, त्यांच्या मुलांच्या, आई-वडिलांच्या डोळ्यात पोटाची चिंता दिसू नये, ही जबाबदारी आपली आहे.

माझं प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाला स्पष्ट आवाहन आहे, जेव्हा गरज पडेल तेव्हा त्यांना अन्न-पाणी पुरवा. औषधोपचारात कोणतीही अडचण येऊ देऊ नका. • त्यांच्या राहण्याची, त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घ्या.

* एकही मराठा बांधव असा राहू नये की ज्याला वाटेल की तो मुंबईत एकटा आहे.

लक्षात ठेवा, ते आपलेच आहेत. त्यांची लढाई जरी आरक्षणासाठी असली, तरी ते आपली जबाबदारी आहेत, आणि आपण महाराष्ट्र सैनिक म्हणून आपली जबाबदारी पूर्ण पार पाडणार आहोत.

आपण सर्वजण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलो, तर त्यांचं मनोबल दुप्पट होईल. आपला प्रत्येक महाराष्ट्र सैनिक या भावनेनं उभा राहील, ही मला खात्री आहे.

जय महाराष्ट्र!

आपला,

अमित राजसाहेब ठाकरे

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com