Elon Musk : अश्लील फोटो वादानंतर, एक्सने मान्य केली चूक; 3500 पोस्ट अन् 600 अकाउंट डिलीट
एलोन मस्क यांच्या मालकीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (माजी ट्विटर) ला अखेर अश्लील कंटेंट प्रकरणी माघार घ्यावी लागली आहे. केंद्र सरकारच्या कडक इशाऱ्यानंतर X ने मोठी कारवाई करत तब्बल 600 अकाउंट डिलीट केली असून 3500 पेक्षा अधिक पोस्ट हटवल्या असल्याची अधिकृत माहिती दिली आहे. यासोबतच, यापुढे प्लॅटफॉर्मवर अश्लील, आक्षेपार्ह किंवा बेकायदेशीर कंटेंटला अजिबात परवानगी दिली जाणार नाही, असे आश्वासनही X कडून केंद्र सरकारला देण्यात आले आहे.
केंद्र सरकारचा कडक इशारा
केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने X ला नोटीस बजावत 72 तासांची मुदत दिली होती. या कालावधीत नियमांचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला होता. मंत्रालयाने स्पष्टपणे नमूद केले होते की, X च्या एआय प्रणालीचा गैरवापर होत असून महिलांची बदनामी करणाऱ्या, तसेच अश्लील प्रतिमा आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर केले जात आहेत. या पार्श्वभूमीवरच X ने आपली चूक मान्य करत तातडीने कारवाई केली.
ग्रोक एआयवर गंभीर आरोप
एलोन मस्कच्या X प्लॅटफॉर्मवरील AI चॅटबॉट ‘Grok’ वर महिला आणि अल्पवयीन मुलांचे अश्लील फोटो तयार केल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. AI Forensics या ना-नफा संस्थेने केलेल्या अभ्यासात धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. 25 डिसेंबर ते 1 जानेवारीदरम्यान ग्रोकने तयार केलेल्या 20,000 प्रतिमांचे विश्लेषण करण्यात आले, त्यापैकी सुमारे 2 टक्के प्रतिमांमध्ये 18 वर्षांखालील व्यक्ती आक्षेपार्ह स्वरूपात दाखवण्यात आल्याचे निष्पन्न झाले.
जागतिक पातळीवर चिंता
या प्रकरणामुळे केवळ भारतच नव्हे तर फ्रान्स, ब्राझील, मलेशिया आणि युरोपियन युनियन यांसारख्या देशांनीही चिंता व्यक्त केली आहे. अनेक सरकारांनी AI च्या वापराबाबत कठोर नियमांची मागणी केली आहे. विशेषतः महिला आणि बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
नियमांचे पालन करण्याचे आश्वासन
X ने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, भविष्यात अशा प्रकारच्या कंटेंटवर कठोर नियंत्रण ठेवण्यात येईल आणि भारतीय IT नियमांचे पूर्ण पालन केले जाईल. मात्र, एलोन मस्क आणि X च्या AI धोरणांवर अजूनही प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, येत्या काळात सरकारची पुढील भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
