India- Pakistan Match : भारताचा पाकिस्तानवर विजय, पण हस्तांदोलन टाळून खेळाडूंनी दिला ठाम संदेश
थोडक्यात
काल दुबईमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पार पडला.
या सामन्यामध्ये भारताने जोरदार कामगिरी केली.
सामना संपल्यानंतर पारंपरिक पद्धतीने हस्तांदोलन न करता भारतीय संघ थेट ड्रेसिंग रुमकडे गेला.
आशिया कप 2025 मधील दुबईत खेळल्या गेलेल्या भारत-पाकिस्तान सामन्यात टीम इंडियाने दमदार कामगिरी करत सात विकेट्सने विजय मिळवला. पाकिस्तानने दिलेलं 128 धावांचं साधं लक्ष्य भारताने केवळ 16 व्या षटकात गाठलं. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने आक्रमक खेळ करत पाकिस्तानला कोणतीही संधी दिली नाही.
पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील तणाव वाढलेला असतानाच या सामन्याला वेगळं महत्व प्राप्त झालं होतं. देशातील अनेक नागरिकांनी भारताने पाकिस्तानविरुद्ध खेळू नये, अशी मागणी केली होती. मात्र सरकारकडून बहुराष्ट्रीय स्पर्धेत खेळण्यासाठी बीसीसीआयला परवानगी मिळाल्यानं भारतीय संघ मैदानात उतरला. तरीसुद्धा चाहत्यांच्या भावना खेळाडूंनी जपल्या.
सामना संपल्यानंतर पारंपरिक पद्धतीने हस्तांदोलन न करता भारतीय संघ थेट ड्रेसिंग रुमकडे गेला. विजयाचा षटकार मारल्यानंतर सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे यांनी एकमेकांचे अभिनंदन केले, पण पाकिस्तानच्या खेळाडूंशी कोणताही संपर्क साधला नाही. इतकंच नव्हे तर भारतीय खेळाडूंनी ड्रेसिंग रुमचा दरवाजाही तोंडावर बंद केला.
या भूमिकेमुळे पाकिस्तानचे खेळाडू क्षणभर गोंधळले असले तरी त्यांनीही शेवटी स्वतःच्या ड्रेसिंग रुमकडे मोर्चा वळवला. भारतीय संघाने खेळातून विजय मिळवतानाच चाहत्यांच्या भावनांना मान देत पाकिस्तानशी औपचारिकता टाळली, हेच या सामन्याचं खास वैशिष्ट्य ठरलं.