पंढरपूर आषाढी वारीत AI चा वापर होणार? राज्य सरकारकडे 2 कोटींचा प्रस्ताव
दैनंदिन जीवनात एआय तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. एआय तंत्रज्ञानाचा वापर आता पंढरपुरातील आषाढी वारीदरम्यान गर्दी व्यवस्थापनासाठी होण्याची शक्यता आहे. पंढरपूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने तसा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला आहे.
पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी वर्षाकाठी एक कोटी भाविक येत असतात. चार यात्रांमध्ये आषाढी यात्रा सर्वात मोठी यात्रा असते. मानांच्या पालख्यांसह अनेक दिंड्या पायी पंढरपूरला येत असतात. दशमी आणि एकादशी दिवशी मंदिर परिसर प्रदक्षिणामार्ग आणि चंद्रभागा वाळवंटामध्ये लाखो भाविक असतात. भाविकांना सुरक्षित दर्शन मिळावे, कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी यात्रेच्या तीन महिना अगोदरच प्रशासनाच्या वतीने तयारी केली जाते.
गर्दी व्यवस्थापन करण्यासाठी आता एआय तंत्रज्ञानाचा वापर
पंढरपूरमध्ये वर्षभरात चार मोठ्या यात्रा भरतात. यामध्ये सर्वात मोठी यात्रा असते ती आषाढी यात्रा. आषाढी यात्रेला 15 ते 16 लाख भाविक पंढरपूरला दर्शनासाठी येत असतात. यामध्ये प्रामुख्याने मंदिर परिसर प्रदक्षिणा मार्ग आणि चंद्रभागा वाळवंट या तीन ठिकाणी लाखो भाविकांची गर्दी असते. यामध्ये गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी आता एआय तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून राज्य सरकारला दोन कोटी रुपयांचा प्रस्ताव दाखल केला आहे.
कसा करणारा एआय तंत्रज्ञानाचा वापर?
प्रत्येक वर्षी होणारा या सोहळ्यासाठी आता एआय तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. या माध्यमातून सुरक्षित गर्दी व्यवस्थापन ही संकल्पना राबवली जाणार आहे. यासाठी चालणारी गर्दी, बसलेली गर्दी आणि उभे राहिलेली गर्दी याचे नियोजन केले जाणार आहे. सध्या यात्रा काळामध्ये वेगवेगळ्या विभागामार्फत गर्दीचे व्यवस्थापन केले जाते. आता मात्र एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सर्व विभागांचे एकत्रिकरण करण्यात येणार आहे. यामध्ये सॅटॅलाइट, इंटरनेट, जीपीएस सिस्टीम, व्हिडिओ शूटिंग, सीसीटीव्ही आणि मानवी व्यवस्थापन सर्व एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एकत्र केले जाणार आहे.
एआय तंत्रज्ञान तयार करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाकडून शासनाकडे दोन कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. निधी प्राप्त झाल्यानंतर संपूर्ण आराखडा तयार केला जाणार आहे. याचा पुढील काही वर्षे यात्रा व्यवस्थापनासाठी फायदा होणार असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले यांनी दिली आहे.
सविस्तर बातमी पाहण्यासाठी क्लिक करा-