Air Line : विमान अपघातानंतर AISATS कार्यालयातील 'तो' व्हिडिओ व्हायरल, 4 वरिष्ठ अधिकाऱ्यांचा राजीनामा
१२ जून २०२५ रोजी अहमदाबाद येथून लंडनकडे निघालेल्या एअर इंडिया फ्लाइट AI-171 या बोईंग 787-8 ड्रीमलाइनर विमानाचा भीषण अपघात झाला. यामध्ये २७० जणांना आपले प्राण गमवावे लागले. या विमान अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या कुटुंबीयांवर आणि नातेवाईकांवर शोककळा पसरली आहे. असे असताना आता AISATS च्या गुरुग्राम कार्यालयातील पार्टीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ विमान अपघात होऊन काही दिवसांनंतरचा असल्याने लोकांमध्ये या व्हिडीओबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. आणि यात महत्वाची बाब म्हणजे हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर यामध्ये दोषी असलेल्या चार वरिष्ठ अधिकाऱ्यांना कंपनीने राजीनामा देण्यास सांगितले आहे.
AISATS ही कंपनी टाटा समूहाचा भाग असलेल्या एअर इंडिया लिमिटेड आणि SAT लिमिटेड यांच्यात ५०-५० टक्के भागीदारी असलेली ही कंपनी आहे. या कंपनीमध्ये असंलेल्या एका पार्टीमध्ये एअर इंडिया SATS (AISATS) चे काही वरिष्ठ अधिकारी आनंदाने नाचताना दिसत असल्याचा एक विडिओ आता समोर आला आहे. विमान अपघात होऊन काही दिवसांनंतर, मुख्य परिचालन अधिकारी अब्राहम जकारिया यांच्यासह चार वरिष्ठ अधिकारी कार्यालयात नाचताना दिसत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडिओ एअर इंडिया SATS च्या गुरुग्राम कार्यालयात DJ पार्टीदरम्यानचा आहे. एआय 171 क्रॅश झाल्यानंतर अवघ्या आठ दिवसांनी एअर इंडिया एसएटीएसचे कर्मचारी नाचत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांमधून तीव्र नाराजी पाहायला मिळाली. अशी दुःखद घटना घडल्यानंतर टाटा समूहाचा भाग असलेल्या कंपनीमधून असा व्हिडिओ समोर येणे हे खूप असंवेदनशील आणि धक्कादायक आहे. त्यामुळे हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर तात्काळ या प्रकरणाची अंतर्गत चौकशी सुरू केली गेली . तसेच, कंपनीने या प्रकरणी चार वरिष्ठ अधिकाऱ्यांना राजीनामा देण्यास सांगितले आहे.
या घटनेनंतर, एआयएसएटीएसने प्रवक्त्यांनी या घटनेबद्दल खेद व्यक्त करत तात्काळ त्यात दोषी असलेल्यांवर कारवाई केली. "AISATS मधील आम्ही सर्व अधिकारी AI १७१ विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत. आणि व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसून आलेल्या प्रकाराबद्दल आम्ही मनापासून खेद व्यक्त करतो," असे प्रवक्त्याने यावेळी सांगितले."हे वर्तन आमच्या मूल्यांशी जुळत नाही आणि सहानुभूती, व्यावसायिकता आणि जबाबदारीसाठी आम्ही वचनबद्ध असून जबाबदार असलेल्यांवर कडक शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे," असे प्रवक्त्याने यावेळी स्पष्ट केले.