National news : भारतासह जगभरात विमानसेवा विस्कळीत, इंडिगो आणि एअर इंडियाच्या 350 हून अधिक उड्डाणे रद्द
एअरबसने त्यांच्या लोकप्रिय A320 मालिकेतील विमानांबाबत महत्त्वाचा सुरक्षा इशारा जारी केला आहे. प्रखर सौर किरणोत्सर्गामुळे विमानांमध्ये बसवलेल्या फ्लाइट-कंट्रोल सिस्टमच्या डेटावर परिणाम होऊ शकतो. हा मुद्दा गंभीर स्वरूपाचा असल्याने जगभरातील विमान कंपन्यांनी सजगता वाढवली आहे.
एअरबसच्या या इशाऱ्यानंतर इंडिगो, एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस यांनी निवेदन जारी करून सांगितले की त्यांच्या ताफ्यातील A320 मालिकेतील विमानांची सेवा तात्पुरती प्रभावित होऊ शकते. सूत्रांच्या माहितीनुसार, भारतात अशा 200 ते 250 विमानांना त्वरित सॉफ्टवेअर अपडेट किंवा आवश्यकतेनुसार हार्डवेअर बदलाची गरज भासणार आहे.
वृत्तसंस्था पीटीआयनुसार, या सुधारणा करण्यासाठी विमान कंपन्यांना संबंधित विमाने काही काळासाठी ग्राउंड करावी लागतील. यामुळे लवकरच उड्डाण वेळापत्रकांमध्ये विलंब किंवा रद्द होण्याच्या घटना वाढण्याची शक्यता आहे. उड्डाण सुरक्षेच्या दृष्टीने हा बदल अत्यावश्यक मानला जात असून, विमान कंपन्यांकडून तयारी जोरात सुरू आहे.
युरोपियन एअरलाइन एअरबसने सांगितले की, ते A320 विमानांसाठी तातडीने सॉफ्टवेअर अपडेटचे आदेश देत आहेत. सॉफ्टवेअर बदल कंपनीच्या सुमारे 6000 विमानांसाठी आहे. जगभरातील निम्म्याहून अधिक विमानांवर हे लागू होते. एअर इंडियाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर करत म्हटले की, एअरबसने A320 साठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत, ज्यामुळे एअर इंडियाच्या ताफ्यातील एअरबस A320 मध्ये काही सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर बदल आहेत.
ज्यामुळे ऑपरेशनल विलंब होऊ शकतो आणि उड्डाणांचा वेळ वाढू शकतो. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. एअरबस A320 रीसेट होईपर्यंत सेवा खंडित होण्याची शक्यता आहे. आम्ही प्रवाशांना विमानतळावर पोहोचण्यापूर्वी https://airindia.com/in/en/manage/flight-status.htlml येथे त्यांची उड्डाण माहिती तपासण्याची विनंती करतो, असे त्यांनी म्हटले.
