Electric Aircraf : आता विमानप्रवास होणार स्वस्त; पहिल्या इलेक्ट्रिक विमानाचे अमेरिकेत उड्डाण यशस्वी
आजच्या 21 व्या युगात विमानाने प्रवास करणे हा अत्यंत खर्चिक प्रवास समजला जातो. सर्वसामान्यांना हा खर्च परवडण्यासारखा नसतो. मात्र आता त्यावरही अमेरिकेने नवीन युक्ती शोधली असून त्यांनी अनोखे इलेक्ट्रिक विमान तयार केले आहे. हे जगातील पहिले प्रवासी इलेक्ट्रिक विमान असून त्याची नुकतीच अमेरिकेमध्ये यशस्वी चाचणी घेण्यात आली.त्यामुळे आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारावर तयार करण्यात आलेल्या इलेक्ट्रिक विमानामुळे विमानप्रवास ही स्वस्त होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
अमेरिकेमधील वॉशिंग्टनमध्ये बीटा टेक्नॉलॉजीने Alia CX300 या पूर्णपणे इलेक्ट्रिक असलेल्या विमानाचे यशस्वी उड्डाण केले. 130 किमीचे अंतर या विमानाने अवघ्या 35 मिनिटांमध्ये पार केले. या विमानाने पूर्व हॅम्प्टन येथून न्यूयॉर्क येथील जॉन एफ केनेडी विमानतळापर्यंचा प्रवास केला. या विमानात कोणत्याही प्रकारच्या इंधनाचा वापर केला गेला नसून हे विमान पूर्णपणे इलेक्ट्रिक विमान आहे. जेवढे अंतर या विमानाने पार केले तेवढे अंतर हेलिकॉप्टरने पार केल्यास साधारण 12,885 रुपयांचा खर्च येतो.
मात्र या इलेक्ट्रिक विमानामुळे हा खर्च केवळ 700 रुपये इतका आला. या विमानात प्रवास करताना कोणत्याही प्रकारचा इंजिनांचा आवाज होत नाही. त्यामुळे प्रवासी आरामदायक प्रवास करू शकतात आणि त्याशिवाय शांतपणे संवाद साधू शकतात. या इलेक्ट्रिक विमानाला चार्जिंग करावे लागते. या चार्जिंग चा खर्च केवळ आठ डॉलर इतकाच आहे. हे विमान एकदा चार्जिंग केल्यानंतर जवळपास 460 किमी अंतर पार करू शकते. त्यामुळे उपनगरांमधील वाहतुकीसाठी हे इलेक्ट्रिक विमान अत्यंत सोयीचे आहे. या इलेक्ट्रिक विमानाच्या चाचणीदरम्यान या विमानात 4 प्रवासी उपस्थित होते.
Alia CX300 ही कंपनी भविष्यामध्ये "फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशनची" अधिकृत मान्यता मिळवण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. भविष्यात अश्या इलेक्ट्रिक विमानांचा वापर प्रवासासाठी केला गेला तर प्रवाशांच्या पैशांची बचत तर होईलच मात्र त्याबरोबर वेळेचीही बचत होणार आहे.