Airport In Beed : बीड जिल्ह्यात विमानतळ उभारणार; विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांची माहिती

Airport In Beed : बीड जिल्ह्यात विमानतळ उभारणार; विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांची माहिती

बीड जिल्ह्यात विमानतळ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

मराठवाडा परिसरातील उद्योगांना नवी चालना देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मराठवाड्यातील उर्वरित जिल्ह्यांना हवाई सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आता बीड जिल्ह्यात विमानतळ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भातील प्राथमिक प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी दिली.

राज्य सरकारने मराठवाड्यातील उद्योग क्षेत्राला गती देण्यासाठी विविध योजनांची आखणी केली असून त्याचा एक भाग म्हणून 'एअर कनेक्टिव्हिटी' हा महत्त्वाचा घटक मानला जात आहे. बीडमध्ये विमानतळाची उभारणी हे या दृष्टीने उचललेले ठोस पाऊल आहे.

विभागीय आयुक्त गावडे यांनी सांगितले की, "बीडसाठी प्रस्तावित विमानतळासाठी धावपट्टी उभारण्याची जागा निश्चित करण्यात आली आहे. संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून प्रस्ताव पुढे पाठवण्यात आला आहे. पाठपुरावाही सुरू असून लवकरच बीडकरांना विमानसेवा उपलब्ध होईल."

या विमानतळामुळे बीड आणि आसपासच्या जिल्ह्यांच्या दळणवळणात क्रांती येणार असून व्यापार, पर्यटन व औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे. तसेच, स्थानिकांना मोठ्या शहरांशी थेट संपर्क साधण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

राज्य सरकारच्या या पावलामुळे मराठवाड्यातील विकासाची गती वाढण्याची आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. बीडकरांसाठी ही बातमी निश्चितच आशादायक असून भविष्यातील बदलांचे संकेत देणारी ठरत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com