Manirao Kokate : अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला
राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा अजित पवार यांनी स्वीकारला असून राजीनाम्याचे पत्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवलं आहे. मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा उपमुख्यमंत्री अजि पवार यांनी स्वीकारल्याचं जाहीर केलं आहे. माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा स्वीकारावा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना असं पत्र अजित पवार यांनी पाठवला आहे. अजित पवार यांनी एक सोशल मीडिया पोस्ट केली आहे. त्या पोस्टद्वारे अजित पवार यांनी राजीनामा स्वीकारल्याची माहिती दिली. आता देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा स्वीकारल्यानंतर माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद अधिकृतपणे जाईल.
माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा स्वीकारला
माणिकराव कोकाटे यांना बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिकेचा लाभ घेण्याच्या प्रकरणात कोकाटे यांनी दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. कनिष्ठ न्यायालयाने ठोठावलेली दोन वर्षांची शिक्षा सत्र न्यायालयाने कायम ठेवली होती. त्यानंतर कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. त्यानंतर आता कोकाटे यांचे खाते काढून घेण्यात होते. क्रीडा खात्याची जबाबदारी अजित पवारांकडे देण्यात आली होती. त्यामुळे कोकाटे हे बिनखात्याचे मंत्री होते. मात्र आता त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे.
संवैधानिक प्रक्रियेनुसार पुढील कार्यवाहीसाठी माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा मुख्यमंत्री महोदयांकडे पाठवण्यात आला आहे. सार्वजनिक जीवन हे नेहमीच संविधानिक नैतिकता, संस्थात्मक प्रामाणिकता आणि न्यायपालिकेच्या सन्मानावर आधारित असावं, या मूल्यांवर आमच्या पक्षाची निरंतर वाटचाल राहिली आहे. कायदेशीर प्रक्रियेवर आमचा ठाम विश्वास आहे. कायदा-व्यवस्थेचं राज्यात काटेकोरपणे पालन होईल, याकरिता आम्ही कटिबद्ध आहोत. लोकशाही मूल्ये जपली जातील व जनतेच्या विश्वासाला तडा जाणार नाही, त्या दृष्टीकोनातून आम्ही सदैव कार्यतत्पर राहू, असं अजित पवार म्हणाले. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी काल राज्यपाल आचार्य देवव्रत यांना पत्र पाठवून माणिकराव कोकाटे यांच्याकडील खाती अजित पवार यांच्याकडे देण्यास सांगितलं होतं.त्या पत्राला आचार्य देवव्रत यांनी मंजुरी दिली होती. त्यामुळं कालपासून माणिकराव कोकाटे हे बिनखात्याचे मंत्री होते.
माणिकराव कोकाटे कोणत्या प्रकरणामुळं अडचणीत?
नाशिक शहरातील उच्चभ्रू परिसरात माणिकराव कोकाटे यांनी 30 वर्षांपूर्वी कमी उत्पन्न दाखवत अल्प उत्पन्न गटातून सदनिका मिळवली होती. स्वत:सह भाऊ विजय कोकाटे, पोपट सोनवणे आणि प्रशांत गोवर्धने या चार जणांनी कॅनडा कॉर्नर भागात निर्माण व्ह्यू अपार्टमेंटमध्ये मुख्यमंत्री कोट्यातून अल्प उत्पन्न गटासाठीच्या सदनिका प्राप्त केल्या होत्या. या प्रकरणी फेब्रुवारी 2025 मध्ये माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयानं दोषी ठरवलं होतं. यावर माणिकराव कोकाटे यांनी नाशिक सत्र न्यायालयात अपिल केलं होतं. सत्र न्यायालयानं शिक्षा कायम ठेवली. उच्च न्यायालयात माणिकराव कोकाटे यांनी धाव घेतली आहे.
