Baramati Malegaon Election : माळेगाव साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी अजित पवार, उपाध्यक्षपदी कोणाची निवड? जाणून घ्या...

Baramati Malegaon Election : माळेगाव साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी अजित पवार, उपाध्यक्षपदी कोणाची निवड? जाणून घ्या...

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या नेतृत्वाची नवी जबाबदारी ठरली असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या नेतृत्वाची नवी जबाबदारी ठरली असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी संगीता कोकरे यांची निवड झाली असून, या निर्णयामुळे राज्यातील सहकारी क्षेत्रात अजित पवार यांची पुनरागमनाची नोंद झाली आहे. ब वर्ग संस्थेच्या मतदारसंघातून 101 पैकी 91 मते मिळवत अजित पवार विजयी ठरले. सहकार आणि प्रशासन क्षेत्रात त्यांचा सुमारे 35 वर्षांचा अनुभव असून, कारखान्याच्या कारभारात स्थैर्य येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दुसरीकडे, विरोधकांकडून या निवडीवर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. संचालक चंद्रराव तावरे यांनी संभाजीनगर खंडपीठाचा संदर्भ देत अजित पवार यांची निवड बेकायदेशीर असल्याचा दावा केला. त्यांच्या मते, ब वर्गातून निवडून आलेल्यांना चेअरमन पदासाठी अपात्र ठरवले गेले आहे. तसेच, रंजन तावरे यांनी आरोप केला की, “अजित पवार यांनी कधीही कारखान्यासाठी ऊस गाळपासाठी योगदान दिले नाही.”

जून महिन्यात पार पडलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत अजित पवार यांच्या निळकंठेश्वर पॅनलने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता हस्तगत केली होती. विरोधी 'सहकार बचाव शेतकरी पॅनल' फक्त एक जागा जिंकण्यात यशस्वी ठरला असून, चंद्रराव तावरे हेच त्यातून निवडून आले.

संचालकांसमवेत पहिलीच महत्त्वपूर्ण बैठक

पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर अजित पवार यांनी तात्काळ सर्व संचालक मंडळ आणि महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची विशेष बैठक बोलावली. ही मेगा मिटिंग बराच वेळ चालली असून, यामध्ये त्यांनी कारखान्याच्या भविष्यातील कार्यपद्धती, ऊस पुरवठा, आर्थिक शिस्त आणि व्यवस्थापनातील पारदर्शकता यासंदर्भात अनेक महत्त्वाच्या सूचना दिल्या, अशी माहिती सूत्रांनी दिली.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com