सहाव्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या अजित पवार यांची राजकीय कारकीर्द
महाराष्ट्राच्या राजकारणातील पॉवरफुल कुटुंबामध्ये जन्मलेले अजित पवार... यांना आपल्या घरातच राजकारणाचं बाळकडू मिळालं. महाराष्ट्राच्या राजकारणात ३ वेळा मुख्यमंत्रीपद भूषविलेले शरद पवार यांचे पुतणे असलेले अजित पवार... बारामतीमधील मातीत त्यांनी राजकारणातील कुस्ती खेळायला शिकले. शरद पवार यांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांनी राजकारणावर आपली पकड मजबूत केली. पक्षामध्ये आपलं वेगळं अस्तित्व निर्माण केलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून पक्षविस्तारापर्यंत सगळ्या जबाबदाऱ्या अजित दादांनी चांगल्या निभावल्या. मात्र, शरद पवार यांची उत्तराधिकारी म्हणून सुप्रिया सुळे यांच्याच नावाला पसंती, पक्षात मिळणारा दुजाभाव या सगळ्या गोष्टी कुठेतरी अजित पवार यांनी खटकत होत्या.
२०१९ मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याशी हातमिळवणी करून अजित पवार यांनी पहाटेचा शपथविधी उरकून बंडाचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचं बंड यशस्वी ठरलं नाही. सत्तास्थापनेसाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी महाविकास आघाडी स्थापन केली. तेव्हा अजित पवार यांनी सत्तेत राहणं पसंत केलं. मात्र, त्या क्षणापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आतल्या आत दोन गट असल्याच्या चर्चांना दुजोरा मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित दादा गट आणि शरद पवार गट अशा गटांमध्ये कार्यकर्ते विभागले जात होते. २०२३ मध्ये अजित पवार यांनी केलेल्या बंडानंतर त्यावर शिक्कामोर्तब झालं. तसेच अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावर देखील हक्क सांगितला. पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह स्वतःकडे ठेवण्याची इच्छा व्यक्त केली आणि विद्यमान अध्यक्ष शरद पवार यांच्यापासून राष्ट्रवादी पक्ष स्वतःकडे घेण्याचे संकेत दिले
२ जुलै २०२३ रोजी त्यांनी महायुतीसोबत हातमिळवणी केली. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रीमंडळात देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत उपमुख्यमंत्री शपथ घेतली. २०२२-२३ या काळात त्यांनी महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून काम केले आहे.
राजकीय कारकीर्द
१९९१ साली पहिल्यांदा अजित पवार बारामतीमधून लोकसभेवर निवडून गेले. नंतर काका शरद पवार यांच्यासाठी त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर शरद पवार पी.व्ही. नरसिंहराव सरकारमध्ये संरक्षणमंत्री झाले.
अजित पवार त्यानंतर १९९५, १९९९, २००४, २००९, आणि २०१४ , २०१९, असे सलग सहा वेळा ते विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेले.
१९९५ साली महाराष्ट्रात (भाजप+शिवसेना) या युतीचे सरकार आले. त्यानंतर १९९९ साली पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार आले.
महाराष्ट्राच्या विलासराव देशमुख सरकारमध्ये त्यांना बढती देऊन कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले. ऑक्टोंबर १९९९ ते डिसेंबर २००३ पर्यंत जलसिंचन खाते त्यांच्याकडे होते. डिसेंबर २००३ ते ऑक्टोंबर २००४ या काळात त्यांच्याकडे ग्रामीण विकास खात्याचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला.
२००४ साली आघाडी सरकार (कॉंग्रस + राष्ट्रवादी काँग्रेस + इतर) पुन्हा सत्तेवर आले तेव्हा जलसिंचन खाते अजित पवारांकडेच होते. २००४ साली त्यांना पुण्याचे पालकमंत्री बनवण्यात आले. २०१४ पर्यंत राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार होते तोपर्यंत ते पुण्याचे पालकमंत्री होते.