शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्याविरुद्ध अजित पवारांचे मत वेगळे; मोदींना पाठिंबा देत नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावर म्हणाले...
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नवीन संसद भवनाचे उद्घाटन झाले. तमिळनाडूच्या अध्यानम संतांनी संपूर्ण विधीपूर्वक सोहळा पार पाडला. परंतु, या उदघाटन सोहळ्यावर विरोधकांनी मात्र बहिष्कार घातला होता. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणावरुन नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती.
याच पार्श्वभूमीवर अजित पवार म्हणाले की, मला व्यक्तिशः असे वाटते की या नवीन इमारतीची गरज होती. कोरोनाच्या काळात विक्रमी वेळेत बांधकाम पूर्ण केले आणि शेवटी आम्हाला एक छान संसद भवन मिळाले. जुनी संसद ब्रिटिशांनी बांधली होती हे आपल्या सर्वांना माहीत आहे.
तसेच अनेक राज्यांनी स्वतःच्या विधानसभा इमारती बांधल्या आहेत. संसदेची जुनी इमारत बांधली तेव्हा 35 कोटी लोकसंख्या होती. आता आम्ही 135 कोटींचा आकडा पार केला आहे. या नव्या संसद भवनात सर्वांनी संविधानानुसार काम करून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवले पाहिजेत. त्यात सर्वांनी सहभागी व्हावे.