अहो, शेतकरी हीच आमची जात आहे; जात विचारून शेतकऱ्यांना खते काय देताय - अजित पवार
मिनाक्षी म्हात्रे, मुंबई
सांगलीतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शेतकऱ्यांना रासायनिक खत खरेदी करायचे असेल तर जातीची अट घालण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. रासायनिक खत खरेदी करताना आता शेतकर्यांना पॉस मशिनवर आपली जात सांगावी लागत आहे. गेल्या काही दिवसापासून ई-पॉस मशिन या सॉप्टवेअर यंत्रणेमध्ये अशा पध्दतीचे अपडेटस् आले आहेत. खत विक्रेत्याला जात सांगितल्याशिवाय शेतकऱ्याला यापुढे खत मिळणार नाही. हे ऑप्शन सिलेक्ट केल्याशिवाय खरेदीची पूर्ण होणार नसल्याचे सांगितले जात आहे. शेतकर्यांना दुकानांत खत खरेदीसाठी गेल्यानंतर नाव, मोबाईल क्रमांक, आधारकार्ड क्रमांक, पोत्यांची संख्या याची माहिती द्यावी लागते. त्यानंतर पॉस मशिनवर शेतकर्यांना अंगठा घेऊन खत दिले जाते. दरम्यान, गेल्या तीन दिवसांपूर्वी ई-पॉस मशिन या सॉप्टवेअर यंत्रणेमध्ये अपडेटस् आले आहेत. त्यामुळे आता खतासाठी जात कशाला पाहिजे असा प्रश्न निर्माण झाला आहे.
याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अहो शेतकरी आमची जात आहे... खते खरेदी करताना शेतकऱ्याना जात कसली विचारताय असा संतप्त सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला सभागृहात विचारला. सांगली येथे रासायनिक खते खरेदी करताना जात विचारली जात असल्याचा मुद्दा अजित पवार यांनी उपस्थित केला व जातीवाद निर्माण करणार्या सरकारला चांगलेच खडेबोल सुनावले.
रासायनिक खते खरेदी करताना शेतकऱ्यांना जात का सांगावी लागत आहे. ती का नोंदवावी लागते आहे असा सवालही अजित पवार यांनी केली. ई पॉस सॉफ्टवेअर मशीनमध्ये जातीचा रखाना टाकण्यात आला आहे. त्यात शेतकऱ्यांना जात सांगावी लागते आहे. त्यामुळे जातीचे लेबल लावण्याचा प्रकार पुरोगामी महाराष्ट्रात घडता कामा नये असेही अजित पवार यांनी खडसावून सरकारला सांगितले. या प्रकरणात कनिष्ठ अधिकारी बळीचे बकरे ठरु नये. कोण यामध्ये सहभागी आहे त्याच्यावर कारवाई करावी आणि जातीचे लेबल बंद करावे व याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणीही अजित पवार यांनी केली.