Ajit Pawar
Ajit Pawar

"लोकांनी निवडून दिलं पण अमोल कोल्हेंनी पाच वर्षात कामं केली नाहीत"; उपमुख्यमंत्री अजित पवारांचा हल्लाबोल

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांचा समाचार घेतला. पवार पुण्यातील महायुतीच्या प्रचारसभेत बोलत होते.
Published by :

Ajit Pawar On Amol Kolhe : अमोल कोल्हेंना आम्ही आमच्या पक्षात घेतलं होतं. त्यांना तिकीट दिलं होतं. त्यांना लोकांनी निवडून दिलं. पण अमोल कोल्हेंनी पाच वर्ष कामं केली नाहीत. ते स्पष्ट म्हणायचे, केंद्र सरकार आपल्या विचाराचं नसल्याने कामं मंजूर होत नाहीत. ते मला म्हणायचे, दादा मी सेलिब्रिटी आहे. दादा मी अभिनेता आहे. दादा मी कलाकार आहे. दादा मला नाटकात काम करावं लागतं. मला मालिकेचा सराव करावा लागतो. मला शुटिंगसाठी सेटवर जावं लागतं. मी म्हटलं शुटिंग वगैरे ठिक आहे, पण लोकांनी आता काय करायचं? लोकांनी तुम्हाला निवडून दिलं आहे, तर तुम्ही लोकांच्या प्रश्नांची जाण ठेवली पाहिजे, असं म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांचा समाचार घेतला. पवार पुण्यातील महायुतीच्या प्रचारसभेत बोलत होते.

सहा विधानसभा मतदारसंघात संपर्क ठेवला पाहिजे. वेळ दिला पाहिजे. वेगवेगळे लोक राजकीय क्षेत्रात येतात. त्यामागे एक विचारसरणी असते. मला वाटलं तुमचं वकृत्व चांगलं आहे, तुम्ही चांगल्या पद्धतीने कामं कराल. पण तुम्ही आमच्या मतदारसंघात येत नाहीत. तुम्ही काही भागात पाच वर्ष गेले नाहीत. पाण्याचे प्रश्न, मेट्रो रेल्वे, रस्ते महामार्गासाठी मोठ्या प्रमाणावर केंद्राचा निधी असतो. केंद्राकडून निधी आणण्याचं काम खासदारांनी करायला पाहिजे. २०१९ ला सभा घेतली आणि अमोल कोल्हेंची उमेदवारी जाहीर करून प्रचाराचा नारळ फोडला. शिवाजी आढळराव पाटील तीनवेळा खासदार होते, तिथल्या अनेक कामांना त्यांनी निधी दिला. पराभूत झाल्यानंतरही त्यांनी संपर्क ठेवला, असंही अजित पवार म्हणाले.

अमोल कोल्हेंवर टीका करताना पवार म्हणाले, गेल्या आठवड्यात अमोल कोल्हेंची सभा झाली. अभिनेता म्हणून त्यांना पाहण्यासाठी लोकांची झुंबड उडाली होती. माझ्या माहितीनुसार, त्यांच्या सभेला १०० लोकही नव्हते. डॉ. अमोल कोल्हे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची आणि स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांची भूमिका केली. पण प्रति शिवाजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेताजी पालकरांचं गाव तांदळीला सुद्धा तुम्ही कधी गेला नाहीत.

मी इथला पालकमंत्री आहे. मी दुध उत्पादकाला वाऱ्यावर सोडणार नाही. माझाही दुधाचा धंदा आहे, किती कष्टाचा धंदा आहे, ते मला पण चांगलं माहित आहे. शेतकरी ही तुमची आमची जात आहे. जसं दुधाच्या बाबतीत मदत केली. तसंच कांद्यासाठीही आम्ही यापूर्वी मदत केली. कांदा निर्यात बंदी का केली? रेसकोर्सच्या मैदानात मोदींची सभा झाली. त्यावेळी मी पंतप्रधान मोदींना सांगितलं की आमचा शेतकरी अडचणीत आहे. कांदा निर्यात बंदी उठवली पाहिजे. हे झालं तर माझ्या शेतकऱ्यांचे कांद्याचे भाव वाढतील आणि शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळेल.

आपल्या संस्था चांगल्या चालल्या तर या भागातील मुलांना चांगलं शिक्षण मिळेल. लोकांचे संसार चांगले चालतील. देशात किंवा राज्यात अनेक बँका अडचणीत आल्या. त्यांना पैसे मिळत नाहीत. मोठ मोठ्या बँका अडचणीत आल्या. त्यामुळे शेतकऱ्यांना त्रास होत आहे. त्यामुळे या भागात आपल्या विचाराचा खासदार निवडून आणायचा आहे, असंही अजित पवारांनी स्पष्ट केलं.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com