Maharashtra Politics : महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवार 17 डिसेंबरला घेणार निर्णायक बैठक
(Maharashtra Politics) गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येतील अशी आशा व्यक्त केली जात होती. आता दोन्ही पक्षांमध्ये हालचाली वाढल्यात आणि अजित पवार एक महत्त्वाची बैठक घेण्याचे ठरवले आहे.
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. 15 जानेवारी रोजी मुंबई, पुणे आणि राज्यातील इतर 29 महापालिकांमध्ये निवडणूक होणार आहे, तर 16 जानेवारीला निकाल जाहीर होईल. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काही ठिकाणी नवीन युती आणि आघाड्यांचे गठबंधन दिसून येत आहेत. अनेक ठिकाणी महायुतीतील घटकपक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत. काही ठिकाणी भाजपा-शिंदे गट आणि भाजपा-राष्ट्रवादी अशी युती होण्याची शक्यता आहे. पुण्यात तर राष्ट्रवादी आणि भाजपा युतीच्या बाहेर एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत. मुंबईत देखील भाजपाशी शिवसेनेची युती होण्याची अधिक शक्यता आहे.
दरम्यान, पुणे महापालिकेची निवडणूक जिंकण्यासाठी अजित पवार मोठा निर्णय घेऊ शकतात. त्यासाठी ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत युती करू शकतात, अशी माहिती मिळाली आहे. याबाबत आता मोठा अपडेट समोर आला आहे.
अजित पवार यांच्या आगामी निर्णयाबद्दल काय माहिती समोर आली आहे?
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने एकत्र यावे अशी मागणी पुण्यातील पक्ष कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. यावर अजित पवार विचार करण्यास तयार आहेत. 17 डिसेंबर रोजी या मुद्द्यावर विचारमंथन होईल आणि त्यासाठी मुंबईत एक विशेष बैठक आयोजित केली जाणार आहे. या बैठकीत खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनिल तटकरे यांसारखे महत्त्वाचे नेते उपस्थित राहतील. पुण्यात राष्ट्रवादी एकत्र यावे की नाही, यावर या बैठकीत चर्चा होईल.
पिंपरी चिंचवडसाठी घेतलेल्या मुलाखती
मुंबईतील या बैठकपूर्वी, अजित पवार आज पुणे जिल्ह्यातील दौऱ्यावर होते. त्यांच्या दौऱ्यात पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी उमेदवार निवडीच्या प्रक्रियेत त्यांनी सहभाग घेतला. आज 700 उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यानंतर अजित पवार यांनी पुण्यातील कार्यकर्त्यांशी बैठक केली. लवकरच शरद पवार यांच्यासोबत युती करायची की नाही याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

