Supriya sule
Supriya sule

"अजितदादा राहिले असते, तर २०२४ ला मुख्यमंत्री झाले असते",निवडणुकीपूर्वी सुप्रिया सुळेंचं मोठं विधान

लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली असून जागावाटपाचा तिढा काही मतदारसंघात अजूनही कायम आहे. तत्पूर्वी, खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकशाही पॉडकास्टमध्ये मोठं विधान केलं आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली असून जागावाटपाचा तिढा काही मतदारसंघात अजूनही कायम आहे. तत्पूर्वी, खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकशाही पॉडकास्टमध्ये मोठं विधान केलं आहे. अजित पवार आमच्यासोबत राहिले असते, तर २०२४ मध्ये ते राज्याचे मुख्यमंत्री झाले असते, असं परखड मत सुळे यांनी व्यक्त केलं आहे.

लोकशाही पॉडकास्टमध्ये सुप्रिया सुळे म्हणाल्या, अजित पवारांच्या काही वैयक्तीत अडचणी असू शकतात. दुसरं काही कारणच नव्हतं. आज इथे राहिले असते, तर २०२४ ला अजित पवार मुख्यमंत्री झाले असते. विरोधक जेव्हा घरातच असतात तेव्हा...? या प्रश्नावर उत्तर देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, "माझी आणि वहिनींची लढाई असूच शकत नाही, त्या माझ्यापेक्षा वयाने मोठ्या आहेत. त्या आमच्या संघटनेत अनेक वर्ष काम करतात, असं काही नाही. त्यांच्या पक्षाने त्यांच्यावर मोठी जबाबदारी टाकली आहे. त्या माझ्या विरोधक होऊच शकत नाहीत. माझ्या मनात त्यांच्याबद्दल विरोधक म्हणून भावना नाहीय.

कारण त्या सक्रिय राजकारणात कधीच नव्हत्या. त्यांनी भविष्यात न पटणाऱ्या घोषणा केल्या तर लढाई नक्कीच होईल. कांद्याच्या निर्यातीच्या बाजूने त्या उभ्या राहिल्या तर लढाई होईल. इथेनॉलचे प्लांट बंद होत आहे, त्याला पाठिंबा दिला तर लढाई होईल. माझी लढाई धोरणांविरोधात होईल. कारण भारतीय जनता पक्षाचे चुकीचे धोरण त्यांना मान्य असतील, तर लढाई करावीच लागेल. ही लढाई सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार नाहीय. शेतकऱ्यांच्या हितासाठी ही लढाई आहे"

सुळेंच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना कॅबिनेट मंत्री अनिल पाटील म्हणाले, "सुप्रिया ताईंनी जे भाकीत केलं आहे की २०२४ मध्ये आघाडीची सत्ता आली असती, तर अजितदादा राज्याचे मुख्यमंत्री राहिले असते. या सर्व घडामोडींमध्ये भविष्यवाणी सत्ता आली असती किंवा नसती, हे कुणी बघितलं नसतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री होण्याची संधी यापूर्वीही देण्यात आली होती, त्यावेळीच राज्याचे मुख्यमंत्री अजितदादा झाले असते. ज्यावेळी संधी होती, त्यावेळी संधीचं सोनं करता आलं नाही. २०२४ चं भाकीत करुन आजतरी काही उपयोग नाही."

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या माध्यमातून केंद्र सरकारने राज्याचा जो विकास केला आहे, हा विकास पाहूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी हा निर्णय घेतला आहे. पूर्ण समजूतदारपणाने हा निर्णय घेतला आहे. राज्याचा मुख्यमंत्री होण्याची संधी राष्ट्रवादीला यापूर्वी येऊन गेली आहे. भविष्यात सत्ता येईल किंवा येणार नाही. आज यावर बोलून काहीच फायदा नाही. सत्ता आली असती तर नंतरचा विषय वेगळा होता. पण सत्ता येऊच शकत नाही, असा सूर होता, मग असे स्वप्न बघणे उचित नाही. २०१९ ला आघाडीची सत्ता स्थापन झाली, त्यात शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस हे पक्ष होते. त्यावेळीही उपमुख्यमंत्री बनवण्यासाठी या सर्व प्रकियेला एक महिना गेला. मग मुख्यमंत्री फारच लांबची गोष्ट आहे, असंही पाटील लोकशाहीशी बोलताना म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com