Ajit Pawar: IPS महिला अधिकाऱ्याला झापल्याच्या व्हायरल व्हिडिओवर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले की..
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सोलापूर जिल्ह्यातील एका घटनेचा व्हिडिओ गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर जोरदार व्हायरल होत आहे. कुई गावात बेकायदा मुरुम उपशावर कारवाई करत असलेल्या आयपीएस अधिकारी अंजली कृष्णा यांना अजित पवारांनी थेट फोन करून कारवाई थांबवण्याचे आदेश दिल्याचा दावा या व्हिडिओत करण्यात आला आहे. त्यात "आपकी इतनी डेरिंग..." अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांना झापल्याचेही ऐकायला मिळत आहे. या घटनेनंतर पवारांवर सर्वच स्तरातून टीकेची झोड उठली होती.
महिला अधिकारी आणि पोलीस दलाचा असा अवमान करणे योग्य नसल्याचे विरोधक, सामाजिक संघटना आणि जनतेकडून तीव्र नाराजी व्यक्त होत होती. विशेषतः महिलांच्या संदर्भात अजित पवारांच्या वक्तव्याला ‘दादागिरीची भाषा’ म्हणून विरोधकांनी हल्लाबोल केला. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही “अजित पवारांची शिस्त आता कुठ गेली?” असा प्रश्न उपस्थित केला होता.
या वाढत्या टीकेच्या पार्श्वभूमीवर अखेर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्वतः एक्सवर पोस्ट करत आपली अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे. पवार म्हणाले की,“सोलापूर जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांसोबतच्या संवादाच्या संदर्भात काही व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहेत. मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, माझा उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा नव्हता. त्या ठिकाणी परिस्थिती शांत रहावी आणि अधिक बिघडू नये, यासाठीच मी हस्तक्षेप केला होता. आपल्या पोलीस दलाबद्दल तसेच धैर्यानं आणि प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर आहे.”
“माझ्यासाठी कायद्याचं राज्य हेच सर्वात महत्त्वाचं आहे. मी पारदर्शक प्रशासकीय कारभारासाठी कटिबद्ध आहे. बेकायदेशीर वाळू, माती, खडक उपशासह प्रत्येक बेकायदेशीर कृतीवर कायद्याप्रमाणे कठोर कारवाई केली जाईल.”
अजित पवारांच्या या स्पष्टीकरणानंतर राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना पवारांनी परिस्थिती शांत ठेवण्याच्या भूमिकेवर भर दिला असला, तरी व्हायरल झालेल्या संवादामुळे त्यांच्या राजकीय प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे मानले जात आहे.