Guwahati : अकासा एअरलाइन्सचे विमान रद्द; गुवाहाटी विमानतळावर प्रवाशांचे ठिय्या आंदोलन
गुवाहाटीवरून मुंबईसाठी रवाना होणारे अकासा एअरलाइन्सचे विमान तांत्रिक बिघाडाचे कारण देऊन आयत्यावेळी अचानक रद्द केले गेले. त्यामुळे संतापलेल्या प्रवाशांनी विमानतळावर एकच गोंधळ घालायला सुरुवात केली. गुवाहाटीवरून मुंबईला येण्यासाठी प्रवासी विमानतळावर विमानाची वाट पाहत होते. मात्र अचानक अकासा एअरलाइन्सच्या अधिकाऱ्यांनी विमान रद्द झाल्याचे कळवले आणि त्यामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी थेट गुवाहाटी विमानतळावरच ठिय्या आंदोलन सुरु केले. यामुळे काही काळ गुवाहाटी विमानतळावर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
गुवाहाटी विमानतळावरून मुंबईला येण्यासाठी शनिवारी सायंकाळी 5 वाजून 40 मिनिटांचे अकासा एअरलाइन्सचे विमान होते. या विमानातील प्रवासी आपल्या विमानाच्या निर्धारित वेळेआधीच विमानतळावर दाखल झाले होते. प्रवासी विमानाची वाट पाहत होते मात्र एअरलाइन्सकडून कोणत्याही सूचना न आल्यामुळे प्रवासी गोंधळले आणि त्यांनी याबाबत विचारणा केली असता सुरुवातीला हवामान अनुकूल नाही त्यामुळे विमान उड्डाणास वेळ लागेल असे कारण पुढे केले.
त्यानंतर रात्री 8.30 नंतर ही अकासा एअरलाइन्सच्या अधिकाऱ्यांकडून कोणतीच अपडेट न मिळाल्यामुळे प्रवासी संतप्त झाले आणि प्रवाशांनी याबाबत जाब विचारला असता चक्क विमानच रद्द झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे प्रवासी संतापले. पायलट आणि केबिन क्रू नसल्यामुळे हे उड्डाण रद्द केल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे संतापलेल्या प्रवाशांनी गुवाहटी विमानतळावरच ठिय्या आंदोलनाला सुरवात केली. एअरलाइन्सने कोणतीही जबाबदारी न घेतल्याचा आरोप यावेळी प्रवाशांनी केला. त्यामुळे गुवाहटी विमानतळावर काही काळ तणावाचे निर्माण झाले होते.
अखेर एअरलाइन्स स्टाफ आणि सीआयएसएफने मध्यस्थी केली आणि प्रवाशांची रात्री एका हॉटेल मध्ये राहण्याची सोय केली. आणि रविवारी सकाळी त्या सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे सकाळी 8.30 वाजता दुसऱ्या विमानाने मुंबईला पाठवण्यात आले. मात्र या घटनेच्या पार्श्वभूमीवर विमान सेवा आणि तेथील अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा याचा पुन्हा एकदा प्रत्यय प्रवाशांना आला आहे.