Aloka the Peace Dog : अमेरिकेतील शांतता यात्रेत ‘आलोका द पीस डॉग’ चर्चेत

Aloka the Peace Dog : अमेरिकेतील शांतता यात्रेत ‘आलोका द पीस डॉग’ चर्चेत

अमेरिकेत सध्या सुरू असलेल्या शांतता यात्रेत एक अनोखा, भावनिक आणि प्रेरणादायी प्रसंग सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

अमेरिकेत सध्या सुरू असलेल्या शांतता यात्रेत एक अनोखा, भावनिक आणि प्रेरणादायी प्रसंग सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. भारतातून गेलेला एक भटका कुत्रा — आलोका (Aloka the Peace Dog) — बौद्ध भिक्षूंंसोबत अमेरिकेत शांततेचा संदेश देत पदयात्रेत सहभागी झाला आहे. या आगळ्यावेगळ्या मैत्रीची दखल New York Post, 11 Alive आणि The Independent यांसारख्या आंतरराष्ट्रीय माध्यमांनी घेतली असून, आलोकाची कहाणी आता जगभर पोहोचत आहे.

भारतात रस्त्यांवर हजारोंच्या संख्येने भटके कुत्रे दिसतात. त्यांच्याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. मात्र आलोकाने एक वेगळाच मार्ग निवडला. एका सामान्य भटक्या कुत्र्यापासून तो आज ‘आलोका द पीस डॉग’ म्हणून ओळखला जात आहे. सध्या तो अमेरिकेत बौद्ध भिक्षूंंसोबत तब्बल २,३०० मैलांची शांतता पदयात्रा पूर्ण करत असून, या प्रवासातील त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.

आलोकाची कथा सुरू झाली भारतात, ११२ दिवसांच्या शांती पदयात्रेदरम्यान. देशभर फिरत गावोगाव शांततेचा संदेश देणाऱ्या बौद्ध भिक्षूंना एका टप्प्यावर एक भटका कुत्रा त्यांच्या मागे चालत येताना दिसला. सुरुवातीला तो काही अंतर चालून निघून जाईल, असे भिक्षूंना वाटले. पण तसे झाले नाही. तो त्यांच्या सोबतच थांबला, रोज चालत राहिला आणि हळूहळू त्या यात्रेचा अविभाज्य भाग बनला.

हा कुत्रा Indian Pariah जातीचा असून, भिक्षूंनी त्याला ‘आलोका’ असे नाव दिले. पाली भाषेत ‘आलोका’ म्हणजे प्रकाश किंवा स्पष्टता. पुढील घटनांनी हे नाव किती योग्य आहे, हे सिद्ध झाले. रणरणते ऊन, मुसळधार पाऊस, थकवा — प्रत्येक अडचणीत आलोकाने भिक्षूंप्रमाणेच प्रवास सुरू ठेवला. एका टप्प्यावर त्याचा कारखाली अपघात झाला आणि तो गंभीर जखमी झाला. त्याला विश्रांती मिळावी म्हणून भिक्षूंनी त्याला ट्रकमध्ये बसवले. मात्र आलोकाने पदयात्रा सोडण्यास नकार दिला आणि ट्रकमधून उडी मारत तो पुन्हा चालू लागला — भिक्षूंच्या पावलांवर पावलं टाकत.

आज ज्या भारतात भटक्या कुत्र्यांकडे अनेकदा दुर्लक्ष होते, त्याच भारतातून गेलेला एक कुत्रा जागतिक शांततेचा चेहरा ठरत आहे. आलोकाने कुठले भाषण दिले नाही, कुठली घोषणा केली नाही. पण त्याच्या प्रत्येक पावलातून शांतता, करुणा आणि माणुसकीचा खरा अर्थ जगाला उमगतो आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com