Alt News च्या मोहम्मद जुबेर यांचा जामीन अर्ज लखीमपूर कोर्टाने फेटाळला
अल्ट न्यूजचे सहसंस्थापक आणि फॅक्ट चेकर मोहम्मद जुबेर यांच्या अडचणी वाढत आहेत. हिंदूंच्या धार्मिक भावना भडकावल्या आणि देवी-देवतांचा अवमान केल्याच्या प्रकरणात जुबेर यांचा जामीन अर्ज लखीमपूरच्या न्यायालयाने फेटाळला आहे. लखीमपूरशिवाय गाझियाबाद, मुझफ्फरनगर, सीतापूर आणि हाथरसमध्येही जुबेरवर खटले सुरू आहेत. जुबेरच्या जामीन अर्जावरील दोन्ही बाजूंच्या सुनावणीदरम्यान खेरी जिल्ह्यातील मोहम्मदी एसीजेएम न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला आहे. दुसरीकडे पोलिसांनी जुबेर यांना रिमांडवर घेण्यासाठी अर्ज केला असून त्यावर 20 जुलै रोजी सुनावणी होणार आहे.
2021 मध्ये मोहम्मदी कोतवालीमध्ये जुबेर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी ए.सी.जे,एम न्यायालयाने ९ जुलै रोजी झुबेरविरुद्ध वॉरंट जारी केले होते. जुबेरच्या वतीने वकिलांनी जामीन अर्ज दाखल केला होता. शनिवारी दुपारी ए.सी.जे,एम रुची श्रीवास्तव यांच्या न्यायालयात या अर्जावर सुनावणी सुरू झाली. बचाव पक्षाचे वकील हरजित सिंग यांनी युक्तिवाद करताना जामीन मंजूर करण्यासाठी पुरेसा आधार असल्याचं नमूद केलं. त्याचबरोबर या प्रकरणाच्या तपासावरही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
दरम्यान, जामीन देण्यास विरोध करताना सरकारी वकिलांनी हे आरोप गंभीर स्वरूपाचे असून याप्रकरणी अद्याप तपास सुरू असल्याचं सांगितलं. त्यामुळे त्यांनी जामीन अर्ज रद्द करण्याची मागणी केली. दोन्ही पक्षांचं म्हणणं व युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला. सायंकाळी न्यायालयीन कामकाज संपण्यापूर्वी जामीन अर्ज रद्द करण्याचे आदेश देण्यात आले. एस.पी. ओ. एस. पी. यादव यांनी सांगितलं की, जुबेरचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. आता 20 जुलै रोजी जुबेरच्या पोलीस कोठडी अर्जावर सुनावणी होणार आहे.

