'काड्या करणे बंद करा!'; चंद्रकांत खैरेंबाबतच्या प्रश्नावर अंबादास दानवेंची संतप्त प्रतिक्रिया
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात सुरू असलेले अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. ज्येष्ठ नेते आणि छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यातील वाद अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय ठरत आहे. मात्र,आता या वादाला आणखी एक कलाटणी मिळाली आहे.
एका पत्रकार परिषदेदरम्यान अंबादास दानवे यांना चंद्रकांत खैरे यांच्याविषयी प्रश्न विचारण्यात आला. हा प्रश्न ऐकून दानवे यांनी थेट संताप व्यक्त करत, "कृपया काड्या करणे बंद करा," असा सल्ला एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराला दिला. त्यांच्या या स्पष्ट प्रतिक्रिया आणि कडक भाषेत दिलेल्या उत्तरामुळे प्रसारमाध्यमांमध्ये एकच खळबळ उडाली. पत्रकार परिषदेत काही काळ शांतता पसरली, तर उपस्थित पत्रकारही एकमेकांकडे पाहू लागले.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी चंद्रकांत खैरे यांनी पत्रकारांशी बोलताना, "कुठलाही वाद नसून, आता सगळं ओके आहे," असं म्हटलं होतं. त्यामुळे सर्व काही सुरळीत झाल्याचे संकेत त्यांनी दिले होते. चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्या वादावर एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने प्रश्न विचारला असता दानवे यांचा हा संताप पाहायला मिळाला. पत्रकार म्हणाले, "प्रश्न विचारणे काम आहे", तर दानवे म्हणाले, "यालाच काड्या करणे म्हणतात."