Ambadas Danve : शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सरकारविरोधात एल्गार!; अंबादास दानवे यांचं कर्जमुक्ती, भरपाई आणि हमीभावासाठी चक्काजाम आंदोलन

छत्रपती संभाजीनगरमध्ये आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी तीव्र चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
Published by :
Rashmi Mane

छत्रपती संभाजीनगरमध्ये आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी तीव्र चक्काजाम आंदोलन करण्यात आले. शहराच्या मुख्य रस्त्यावर रास्तारोको करत दानवे यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) तसेच स्थानिक शेतकरी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनामागील मुख्य कारण म्हणजे शेतकऱ्यांना तातडीने कर्जमुक्ती मिळावी, नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, वीज पंपासाठी थकीत अनुदान लवकर मिळावे. तसेच जाहीर केलेल्या शासकीय योजनांची अंमलबजावणी करण्यात यावी.

अंदाजे 60 हेक्टर क्षेत्रातील शेतीचे नुकसान झाले असून त्याची भरपाई अद्याप मिळालेली नाही. तसेच अनेक शेतकऱ्यांनी वीजपंप जोडणीसाठी पैसे भरून आठ महिने झाले, तरी वीज मिळालेली नाही. शेतमालाला हमीभाव न मिळाल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. सरकारकडून केवळ घोषणा केल्या जातात. मात्र प्रत्यक्ष कृती दिसून येत नाही, असा आरोप दानवे यांनी केला. त्यांनी सरकारवर घणाघात करत सांगितले की, “हे सरकार शेतकऱ्यांचं नाही. जे वचन दिलं, ते पूर्ण करणं सरकारचं नैतिक कर्तव्य आहे. वारंवार मागण्या करूनही सरकार गांभीर्याने घेत नाही, ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे.”

या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. स्थानिक पोलीस निरीक्षक व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि आंदोलकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलक ठाम होते की, “मागण्या पूर्ण झाल्याशिवाय माघार नाही.” अशा प्रकारे छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांच्या न्यायासाठी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात आले असून, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.

हेही वाचा

Ambadas Danve : शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सरकारविरोधात एल्गार!; अंबादास दानवे यांचं कर्जमुक्ती, भरपाई आणि हमीभावासाठी चक्काजाम आंदोलन
Raj Thackeray meet Devendra Fadnavis : राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी; वांद्र्यातील हॉटेलमध्ये राज ठाकरे - देवेंद्र फडणवीसांची भेट
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com