Amit Shah
Amit Shah

"राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उद्धव ठाकरे, राहुल गांधी उपस्थित राहिले नाहीत, कारण...", अमित शहांनी स्पष्टच सांगितलं

भारताचा तिरंगा काश्मीरच्या आकाशात फडकवण्याचं काम मोदींनी केलं आहे, असं मोठं विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे. शहा धुळ्यात सुभाष भामरे यांच्या प्रचारसभेत बोलत होते.
Published by :

Amit Shah On Rahul Gandhi And Uddhav Thackeray : राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचं निमंत्रण देऊनही उद्धव ठाकरे, राहुल गांधी या सोहळ्याला उपस्थित राहिले नाहीत. कारण त्यांना त्यांच्या वोट बँकेची भीती वाटत आहे. आम्हाला त्या वोट बँकेची भीती नाही. औरंगजेबने काशी विश्वनाथ तोडलं होतं, त्या काशी विश्वनाथचं कॉरीडोअर बनवण्याचं कामही नरेंद्र मोदींनी केलं होतं. नरेंद्र मोदींनी देशाला सुरक्षित करण्याचं काम केलं आहे. मल्लिकार्जून म्हणतात, महाराष्ट्र आणि राजस्थानचा काश्मीरशी काय संबंधं? खर्गे साहेब ८० वर्षांचे झाले आहेत, पण तुम्हाला धुळेच्या जनतेबद्दल माहित नाही. धुळ्यातील बच्चा आणि बच्चा काश्मीरसाठी जीव देऊ शकतो. नरेंद्र मोदींना दुसऱ्यांदा पंतप्रधान केल्यानंतर त्यांनी काश्मीरचं ३७० कलम हटवलं. भारताचा तिरंगा काश्मीरच्या आकाशात फडकवण्याचं काम मोदींनी केलं आहे, असं मोठं विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे. शहा धुळ्यात सुभाष भामरे यांच्या प्रचारसभेत बोलत होते.

शहा विरोधकांवर टीका करत पुढे म्हणाले, राहुल गांधी म्हणतात, कलम ३७० हटवलं ते चांगलं झालं नाही. मोदींनी कलम ३७० हटवून दहशतवाद संपवण्याचं काम केलं आहे. देशातील नक्षलवाद संपवण्याचं काम मोदींनी केलं आहे. काँग्रेसच्या सरकारमध्ये शरद पवार कृषीमंत्री होते, त्यावेळी देशात बॉम्बस्फोट होत होते. दहशतवाद्यांनी उरी आणि पुलवामात हल्ला केला. पण यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी होते. त्यांनी पाकिस्तानच्या घरात घुसून सर्जिकल स्ट्राईक केला आणि दहशतवाद्यांचा खात्मा केला.

राहुल गांधी देशाला सुरक्षित ठेऊ शकत नाही. राहुल गांधी देशाला समृद्ध करु शकत नाही. मोदींनी देशातील अर्थव्यवस्था ११ व्या क्रमांकावरून ५ व्या क्रमांकावर आणण्याचं काम केलं. मोदी गॅरंटी लक्षात ठेवा. तिसऱ्यांदा नरेंद्र मोदींना पंतप्रधान करा. त्यानंतर आम्ही देशाची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर आणू. मोदींनी देशातील विकासाला पुढे नेण्याचं काम केलं आहे.

शहा पुढे म्हणाले, देशात चौथ्या टप्प्याची निवडणूक सुरु आहे. देशात, महाराष्ट्रात जिथे जिथे निवडणूक होत आहे, सर्व जनतेला आवाहन करतो की, सहा वाजेपर्यंतची वेळ आहे. खूप मोठ्या संख्येत मतदान करा. देशाला सुरक्षित ठेवणारं सरकार निवडून द्या. ही निवडणूक दोन विभाग आहेत. एकीकडे नरेंद्र मोदी आहेत. तर दुसरीकडे राहुल बाबा (राहुल गांधी) आहेत. एकीकडे १२ लाख कोटी रुपयांचा घोटाळा, भ्रष्टाचार करणारी काँग्रेस पार्टी आणि त्यांचे नेते आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री राहून २३ वर्षात एकाही रुपयाचा भ्रष्टाचाराचा आरोप नाही, असे नरेंद्र मोदी आहेत.

थोडी गरमी वाढली की, राहुल गांधी बँकॉक आण थायलंडला जातात. पण नरेंद्र मोदी यांनी २३ वर्षात दिपावलीचीही सुट्टी घेतली नाही. ते देशाच्या सीमेवर सैनिकांसोबत दिवाळी साजरी करतात. चांदीच्या चमचासोबत जन्माला आलेले राहुल गांधी एकीकडे आहेत. तर दुसरीकडे चहा विकणारे, गरिबाच्या घरात जन्माला आलेले नरेंद्र मोदी आहेत.

सुभाष भामरेंना दिलेलं एक एक मत थेट नरेंद्र मोदींना प्रधानमंत्री करण्यासाठी कामी येणार आहे. काँग्रेस पक्ष, शदर पवार ७० वर्ष राम मंदिराच्या मुद्द्याला विरोध करत होते. तुम्ही नरेंद्र मोदींना दुसऱ्यांदा प्रधानमंत्री केलं. मोदींनी पाच वर्षात केस जिंकली. त्यानंतर २२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठा करून जय श्री रामचा नारा दिला, असंही शहा म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com