Amol kolhe
Amol kolhe

"छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं असेल, तर..."; अमोल कोल्हेंनी भाजपवर डागली तोफ

अमोल कोल्हे यांनी भाजप सरकारवर तोफ डागली आहे. ते डॉ. शोभा बच्छाव यांच्या प्रचारसभेत बोलत होते.
Published by :

Amol Kolhe On BJP : छत्रपती केवळ व्यक्ती नाही. छत्रपती केवळ घराणा नाही. छत्रपती हा एक विचार आहे. रयतेच्या भाजीच्या देठाला हात लागू देऊ नका, असं सांगणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं असेल, तर कांदा उत्पादक शेतकऱ्याला देशोधडीला लावणाऱ्या, सोयाबीनला भाव न देणाऱ्या भारतीय जनता पक्षाची पाठराखण कशी करणार? हा प्रश्न तेव्हा मनात निर्माण झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श जेव्हा सांगायचा असतो, तेव्हा ज्या महिला कुस्तीपटूंनी जगभरात देशाची मान उंचावली होती, त्या आमच्या लेकींच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणात कोणतीही कारवाई झाली नाही. स्वत:च्या हक्कासाठी आंदोलन करत असताना या महिला कुस्तीपटूंना दिल्लीच्या रस्त्यावर फरफटत नेऊन तुरुंगात टाकलं, असं म्हणत अमोल कोल्हे यांनी भाजप सरकारवर तोफ डागली आहे. ते डॉ. शोभा बच्छाव यांच्या प्रचारसभेत बोलत होते.

"असा निर्णय नेत्यांनी घेतला असेल, तर नेते कुणाची पाठराखण करतात? हे सर्वांनी पाहणं गरजेचं आहे. गंगा-यमुना काठच्या भुसभुशीत मातीत वावरणाऱ्या माणसांना सह्याद्रीच्या कड्याची आज ओळख नाही", असं म्हणत अमोल कोल्हे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर अप्रत्यक्षरित्या टीका केली. अमोल कोल्हे पुढे म्हणाले, मंदिरातील देव, गोठ्यातील गाय आणि घरातील माय ज्यांच्यामुळे सुरक्षीत राहिली, ते माणूस म्हणून जन्माला येऊन कर्तुत्वाच्या जोरावर दैवत्वाला पोहचलेले छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रात आहेत. तो आमचा वारसा आहे. तो आमचा वसा आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातले दोन प्रादेशिक पक्ष फोडण्यात आले. बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली शिवसेना, शरद पवार साहेबांनी निर्माण केलेली राष्ट्रवादी काँग्रेस फोडली. या दोन व्यक्तीचं महाराष्ट्रात स्थान काय आहे, याचा जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा सर्वजण सांगतील, सर्वसामान्य शेतकऱ्याला आणि मराठी माणसाला आत्मभान देण्याचं काम बाळासाहेब ठाकरेंनी दिलं. टिचलेल्या, वाकलेल्या शेतकऱ्याला स्वाभिमान देण्याचं काम शरद पवारांनी केलं आहे.

या दोन माणसांचे प्रादेशिक पक्ष फोडल्यानंतर महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातला पळवून नेले. महापुरुषांचा अपमान झाला, तेव्हा महायुतीच्या कोणत्याच नेत्यानं छातीठोकपणे सांगितलं नाही की, हे खपवून घेतले जाणार नाही. कांदा निर्यात बंदी उठवण्याबाबत महायुतीच्या ३९ खासदारांपैकी एकानेही संसदेत प्रश्न मांडला नाही, असं म्हणत अमोल कोल्हे यांनी महायुतीवर सडकून टीका केली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com