Amol Mitkari : "...तर दोन्ही पवार एकत्र येतील" आमदार अमोल मिटकरींकडून पवारांच्या युतीबाबत शक्यतेचे संकेत

Amol Mitkari : "...तर दोन्ही पवार एकत्र येतील" आमदार अमोल मिटकरींकडून पवारांच्या युतीबाबत शक्यतेचे संकेत

अमोल मिटकरी यांनी शरद पवार आणि अजित पवार दोघही एकत्र येण्याच्या शक्यतेचे संकेत दिले आहेत, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.
Published by :
Prachi Nate
Published on

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर, दोन गटांमध्ये पुन्हा एकत्र येण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी केलेल्या वक्तव्याने या चर्चेला नवी दिशा मिळाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन गट, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील गट आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गट, गेल्या वर्षभरात वेगवेगळ्या राजकीय मार्गावर गेले. या विभाजनानंतर अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि जनतेत गोंधळाची स्थिती निर्माण झाली. मात्र, आता अमोल मिटकरींसारख्या सडेतोड बोलणाऱ्या नेत्याकडून एकत्र येण्याच्या शक्यतेचे संकेत मिळाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. आषाढी एकादशी हा महाराष्ट्रातील श्रद्धेचा पर्व आहे.

या पार्श्वभूमीवर पांडुरंगाच्या इच्छेचा दाखला देत आमदार मिटकरी म्हणाले, "राजकारणात काहीही अशक्य नसतं. आषाढी एकादशीला बहीण-भाऊ एकत्र विठोबाच्या दर्शनाला जातातच. तसंच राजकारणातही विचार आणि भावना जुळल्या, तर पवार काका आणि अजितदादा पुन्हा एकत्र येऊ शकतात." शरद पवार यांनी मागील काही दिवसांत महाराष्ट्र दौऱ्याद्वारे जनतेशी संवाद वाढवण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे अजित पवार गट सरकारमध्ये सत्ताधारी असून त्यांचे मंत्री महत्त्वाच्या खात्यांवर कार्यरत आहेत. अशा स्थितीत एका सामंजस्याच्या मार्गाने दोन्ही गट एकत्र आल्यास राज्याच्या राजकारणात मोठा बदल होऊ शकतो.

अमोल मिटकरींचं वक्तव्य हे केवळ भावनिक नाही, तर येत्या काळात राष्ट्रवादीतील अंतर्गत हालचालींचा संकेतही असू शकतो. असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केला. या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्येही आशेचे वातावरण तयार झालं आहे. दोन गटांमधील संघर्षाने अनेक निष्ठावान कार्यकर्ते संभ्रमात होते. आता दोन्ही बाजूंनी एकत्र येण्याच्या शक्यतेने संघटनबांधणीला नवसंजीवनी मिळू शकते, असं कार्यकर्त्यांचं मत आहे. आषाढी एकादशी ही केवळ भक्तीची नाही, तर महाराष्ट्रात सामाजिक आणि राजकीयदृष्ट्याही महत्त्वाची मानली जाते.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com