'या' लाडक्या बहिणी’चे पैसे सरकारने पुन्हा घेतले; काय प्रकरण?
‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेत निकष डावलून लाभ घेतलेल्या व्यक्तींविरुद्ध कारवाई सुरू झाली आहे. यानुसार धुळे जिल्ह्यात एका लाभार्थीला मिळालेले साडेसात हजार रुपये सरकारच्या तिजोरीत परत जमा करण्यात आले आहेत.
धुळे जिल्ह्यातील नकाणे गावातील एका महिलेचे पाच महिन्याचे पैसे परत घेण्यात आले आहेत. खैरनार नामक महिलेने सरकारी योजनेचा दुबार लाभ घेतल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. तिने अन्य एका योजनेतही आर्थिक लाभ घेतला होता. लाडकी बहीण योजनेचे पैसे परत करण्याचे तिला सांगण्यात आले. यानुसार साडेसात हजार रुपये सरकारी तिजोरीत जमा करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करताना सुरुवातीला विविध निकष निश्चित करण्यात आले होते. मात्र, निवडणुका जवळ आल्यामुळे सर्व अर्ज सरसकट स्वीकारले गेले. महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेवर आल्यानंतर, अर्जांची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला गेला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजनेचा आढावा घेतल्यानंतर अर्जांची पडताळणी करण्याची घोषणा महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी केली. धुळ्यात एका महिलेने सरकारी योजनेचा दुबार लाभ घेतल्याचे चौकशीत समोर आले, त्यानंतर संबंधित महिलेचं मिळालेलं आर्थिक सहाय्य परत घेण्यात आले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो शासन निर्णय काढण्यात आलेला आहे. त्यामध्ये कसलाही बदल होणार नाही, असं आदिती तटकरे यांनी म्हटलं. ज्यांचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असेल त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहेत. काही महिलांकडून ऑनलाइन अर्ज आणि ऑफलाइन अर्ज आले होते. काही महिलांचं लग्नानंतर स्थलांतर देखील झालं असल्याचं आदिती तटकरे म्हणाल्या. चारचाकी वाहनं ज्यांच्या नावावर असतील आणि तरी देखील ज्यांनी अर्ज केला असेल त्यांच्या नावांचा शोध घेण्यासाठी परिवहन विभागाकडून माहिती घेतली जाईल, असं देखील आदिती तटकरे म्हणाल्या. आधार कार्ड आणि बँकेतील नावात तफावत असल्यास ते अर्जदार पात्र असणार नाहीत, असं आदिती तटकरे यांनी म्हटलं.
काय आहेत निकष?
ज्या महिलांचा परिवार इन्कम टॅक्स भरतो अशा महिलांना आता या योजनेचा लाभ मिळणार नाही. ज्या महिलाकडे चार चाकी वाहन आहे त्यांना अपात्र करण्यात येणार आहे. इतर सरकारी योजनेचा लाभ घेत असणाऱ्या महिलांना फक्त फरकाची रक्कम मिळेल. ज्या महिलांचं बँक खात्यावरील नाव आणि आधार कार्डवरील नाव वेगवेगळे आहे अशा महिलांना अपात्र केले जाणार आहे. ज्या महिला लग्न करून परराज्यात स्थायिक झाल्या आहेत अशा महिलांनाही आता लाडक्या बहीणीचा लाभ घेता येणार नाही.