Chandrapur Accident : चंद्रपूरात भरधाव बस पलटली! चालकासह दोघांचा मृत्यू, तर 8 गंभीर जखमी

Chandrapur Accident : चंद्रपूरात भरधाव बस पलटली! चालकासह दोघांचा मृत्यू, तर 8 गंभीर जखमी

चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर-वरोरा महामार्गावर मंगळवारी सकाळी एक भीषण अपघात घडला. प्रवाशांनी भरलेली एसटी बस रस्त्याच्या कडेला उलटली.
Published by :
Team Lokshahi
Published on

चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर-वरोरा महामार्गावर मंगळवारी सकाळी एक भीषण अपघात घडला. प्रवाशांनी भरलेली एसटी बस रस्त्याच्या कडेला उलटली. या दुर्घटनेत चालकासह दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून, आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ही बस चिमूरहून चंद्रपूरकडे जात असताना चारगावजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे बस खोल खड्यात जाऊन उलटली.

बसमधील सुमारे 35 प्रवासी प्रवास करत होते. अपघाताच्या क्षणी बसमध्ये एकच गोंधळ उडाला, आणि अनेक प्रवासी मदतीसाठी ओरडू लागले. या दुर्घटनेत बसचालक आणि एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला. आठ प्रवासी गंभीर जखमी असून, 15 जणांना किरकोळ मार लागले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी आणि स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी चंद्रपूरच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले असून, काहींची प्रकृती चिंताजनक आहे.

या अपघातामागे भरधाव वेग आणि वळणावर नियंत्रण न राखू शकल्यामुळे गाडी उलटल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तपास सुरू केला आहे. प्रत्यक्षदर्शींचे जबाबही नोंदवले जात आहेत. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक सुरक्षेच्या उपाययोजनांवर आणि एसटीच्या वाहनांची देखभाल, तसेच चालकांच्या विश्रांतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संपूर्ण जिल्ह्यात या दुर्घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com