Anand Paranjpe On Jitendra Awhad
Anand Paranjpe On Jitendra Awhad

"पवार कुटुंबाच्या नात्यावर राजकीय पोळी भाजू नका", आनंद परांजपेंचा जितेंद्र आव्हाडांवर निशाणा

श्रीनिवास पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजकीय भूमिकेवर नाराजी व्यक्त केली होती.
Published by :

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार विरुद्ध शरद पवार गट असा राजकीय सामना रंगला आहे. याच पार्श्वभूमीवर दोन्ही गटातील नेते एकमेकांवर कुरघोड्या करत आहेत. अशातच श्रीनिवास पवार यांनी त्यांचे बंधू राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजकीय भूमिकेवर नाराजी व्यक्त केली होती. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. परांजपे यांनी माध्यमांशी बोलताना शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर निशाणा साधला आहे."माझी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना विनंती आहे, पवार कुटुंबाच्या नात्यावर आपली राजकीय पोळी भाजू नका. आपले कौटुंबिक संबंध अधिक वृद्धिंगत कसे होतील, त्याच्याकडे त्यांनी लक्ष द्यावं, असं म्हणत परांजपे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर निशाणा साधला.

आमचं श्रद्धास्थान असलेल्या शरद पवारांपेक्षाही जितेंद्र आव्हाड हे मोठे झालेले आहेत. पवार साहेबांची चूक झाली, असं ते नेहमी बोलतात. परंतु, पवार साहेबांची चूक काढण्या ऐवढे ते मोठे झालेले नाहीत. दोन दिवसांपूर्वी कळव्यामध्ये याचा प्रत्यय आला होता. एकीकडे म्हणायचं पवार साहेब आमचे बाप आहेत आणि भारत जोडो यात्रेच्या मोठ्या बॅनरवर फक्त राहुल गांधींचा फोटो होता स्वतःचा फोटो होता. आपण ज्याला बाप म्हणतात त्या बापाचा फोटो बॅनर वर नव्हता, असं म्हणत परांजपे यांनी आव्हाडांवर टीकास्त्र सोडलं.

अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार यांच्याबद्दल प्रतिक्रिया देताना परांजपे म्हणाले, रक्ताची नाती म्हणजे कुटुंब नाही .दोन जुलै रोजी अजित पवार यांनी वेगळी राजकीय भूमिका घेतली. त्यावेळी महाराष्ट्रातील तमाम कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांच्यासोबत कुटुंब म्हणून संलग्न झाले. तसंच परांजपे यांनी बारामती लोकसभेबाबत मोठं वक्तव्य केलं. बारामतीची जनता हीच अजितदादा पवार यांचं कुटुंब आहे. बारामती लोकसभेच्या निवडणुकीत हे संपूर्ण कुटुंब अजितदादा पवार यांच्या पाठीशी उभं राहिलेले दिसेल, असं ते म्हणाले.

लोकसभा निवडणुकीबाबत बोलताना परांजपे यांनी स्पष्ट भूमिका मांडली, ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुतीमध्ये जेवढ्या लोकसभेच्या जागा मिळतील, त्या जागेवर घड्याळ चिन्ह घेऊन राष्ट्रवादीचा विजय होईल.हा आमचा सगळ्या कार्यकर्त्यांचा संकल्प आणि मानस आहे.

आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एनडीएचा घटक पक्ष आहोत. महाराष्ट्रात महायुती म्हणून भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जात आहेत. महायुतीच्या कार्यकर्त्यांचा हाच संकल्प आहे की, 45 प्लस खासदार महाराष्ट्रातून निवडून गेले पाहिजेत. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवायचं आहे. अमित शहा, भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे चर्चा करत आहेत. राष्ट्रवादीला लोकसभेमध्ये महायुतीतील सन्मान जनक जागा लढायला मिळतील. येणाऱ्या दोन-तीन दिवसांमध्ये आम्हाला मिळणाऱ्या जागांची घोषणा होईल, असंही परांजपे माध्यमांशी बोलताना म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com