गुढीपाडवा तोंडावर आला मात्र, धान्य दुकानापर्यंत आनंदाचा शिधा अजून पोहोचलाच नाही
Admin

गुढीपाडवा तोंडावर आला मात्र, धान्य दुकानापर्यंत आनंदाचा शिधा अजून पोहोचलाच नाही

गुढीपाडवा तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता.

गुढीपाडवा तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता. अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील केशरी शेतकरी शिधा पत्रिकाधारकांना १ किलो रवा, १ किलो चनाडाळ, १ किलो साखर आणि १ लिटर पामतेल असा आनंदाचा शिधा गुढी पाडव्यापासून पुढील १ महिन्याच्या कालावधीसाठी ई-पॉसद्धारे १०० रुपये प्रतिसंच असा सवलतीच्या दरात दिला जाईल. ई-पॉसची व्यवस्था नसलेल्या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने हा शिधा दिला जाईल असे सांगण्यात आले होते.

मात्र गुढीपाडवा सण तोंडावर आला असताना अजून आनंदाचा शिधा स्वस्त धान्य दुकानापर्यंत पोहचलेला नसल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर गोरगरिबांना आनंदाचा शिधा मिळणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळेही शिधा वाटप प्रक्रियेला उशीर होण्याची शक्यता आहे.

हा आनंदाचा शिधा देण्याकरिता आवश्यक शिधा जिन्नसांची खरेदी करण्याकरिता महाटेंडर्स या ऑनलाईन पोर्टलद्धारे २१ दिवसांऐवजी १५ दिवसांच्या कालावधीत निविदा प्रक्रिया राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. २०२२ मध्ये दिवाळी सणानिमित्त शिधाजिन्नस खरेदीसाठी पार पडलेल्या निविदा प्रक्रियेत २७९ प्रति संच या दरानुसार ४५५ कोटी ९४ लाख आणि इतर अनुषंगीक खर्चासाठी १७ कोटी ६४ लाख अशा ४७३ कोटी ५८ लाख इतक्या खर्चास देखील मान्यता देण्यात आली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com