Anganewadi Jatra : आंगणेवाडीच्या जत्रेची तारीख ठरली; 2 मार्चला होणार आंगणेवाडीची जत्रा
महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात आंगणेवाडी हे गाव आहे. लाखो भाविकांच श्रद्धास्थान असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आंगणेवाडीच्या श्री भराडी देवीची जत्रा 2मार्चला होणार आहे. कोकणात जत्रा म्हटलं की उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतं. कोकणातील गावागावात वर्षाच्या ठराविक तिथीला प्रत्येक गावात जत्रा भरते. मात्र भराडी देवीच्या जत्रेची तारीख कुठल्या पंचागात अथवा कॅलेंडरमध्ये सापडणार नाही, कारण ती निश्चित नसते. देवीचा कौल मिळाल्यावरच तारीख ठरते.
सामान्य कोकणवासीयांसोबतच महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेते,कलाकार मंडळी या देवीच्या यात्रेला दरवर्षी हमखास भेट देतात. दीड दिवसाच्या जत्रेमध्ये दरवर्षी कोट्यांची उलाढाल होत असते. आंगणेवाडीच्या जत्रेला लाखोंच्या संख्येने भाविक येतात. खासकरुन मुंबईतून मोठया संख्येने भाविक देवीच्या दर्शनाला जातात. देवीला कौलप्रसाद लावून यात्रोत्सव ठरविला जातो. मुंबईकरांची प्रचंड गर्दी असते. आंगणेवाडीच्या भराडी देवीचा नैवेद्य खास असतो. आंगणे कुटुंबियांच्या माहेरवाशिणी तो अबोल राहून करतात.
मालवण तालुक्यातील आंगणे वाडी हे लहानसे गाव आहे. या गावात 'भराडीदेवी' विराजमान आहे. मसुरे गावच्या या आंगणेवाडीच्या या वाडीत केवळ आंगणे कुटुंबीयांची ही देवी आहे. भरडावर देवी प्रकट झाली म्हणून या देवीचं नाव 'भराडी देवी ' असं ठेवण्यात आलं आहे. भराड म्हणजे माळरान.